तंत्रशिक्षण संचालनालयाकडे प्रस्ताव सादर

चिन्मय पाटणकर, पुणे

घटत्या विद्यार्थी संख्येचा फटका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच तंत्रनिकेतन संस्थांनाही बसला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत राज्यभरातील २७ तंत्रनिकेतन संस्थांना (पॉलिटेक्निक) टाळे लागण्याची शक्यता आहे. २७ संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे संस्था बंद करण्यासाठीचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात नागपूर विभागातील सर्वाधिक तंत्रनिकेतन संस्थांचा समावेश आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांचे स्थलांतर, संस्था बंद करणे, नवीन पदविका सुरू करणे यासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार २७ तंत्रनिकेतन संस्थांनी संस्था बंद करण्यासाठीचे प्रस्ताव सादर केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रमांकडे ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीप्रमाणे तंत्रनिकेतन संस्थांतील जागा रिक्त राहू लागल्या. २०१७ मध्ये तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेतील ८० हजार ८३५ जागा आणि २०१८ च्या प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील तंत्रनिकेतनच्या सुमारे ७२ हजार जागा रिक्त राहिल्या. तंत्रनिकेतन संस्थेत विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार शुल्क भरावे लागत असूनही जागा भरत नाहीत. परिणामी संस्था चालवणे अवघड झाल्याने संस्थाचालकांनी संस्था बंद करण्याचे प्रस्ताव सादर केले. या संस्था बंद झाल्यास तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेतील सुमारे पाच हजार जागा कमी होतील.

 

विभागनिहाय संस्था

नागपूर               ८

नाशिक               ५

पुणे                      ५

औरंगाबाद         ४

मुंबई                    ३

अमरावती           २

औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला पसंती

गेल्या काही वर्षांत राज्यभरात औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून पसंती मिळाली आहे. त्यामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांसाठी राज्यभरातील १९ संस्थांनी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची पदविका सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केले.त्यात पुण्यातील सहा संस्थांचा समावेश असून, उर्वरित संस्था नगर, रत्नागिरी, नाशिक, रायगड, जळगाव, वर्धा, नागपूर, धुळे या शहरांतील असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.