भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्याने निराश झालेल्या बीड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केली. महादेव आश्रूबा डोंगरे (वय २७) असे या तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील कोळपिंपरी गावचा रहिवासी होता. त्याने मध्य प्रदेशमध्ये ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.

महादेव डोंगरे या तरुणाचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. तो दिवसरात्र यासाठी मेहनत करायचा. गेल्या काही वर्षांपासून त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण त्याचे हे स्वप्न पूर्ण होत नव्हते. तो अनेकदा सैन्यभरतीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचा. पण त्याला अपयशच येत होते. यामुळे तो निराश झाला होता.

पाच दिवसांपूर्वी नागपूर येथील मित्रांकडे जात असल्याच सांगून महादेव घराबाहेर पडला. तिकडेच काम करेन आणि भरती पूर्व परीक्षेचा अभ्यास करणार, असे त्याने कुटुंबियांना सांगितले. मात्र, नागपूरला न जाता त्याने थेट मध्यप्रदेश गाठले. २९ मे रोजी मध्यप्रदेशमधील अंबाला येथे ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. जो आपल्या देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूंचा नायनाट करणार होता. तो शेवटी जीवनातील लढाईत हरला, अशी प्रतिक्रिया त्याच्या मित्रांनी दिली.