लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून २७ वर्षांच्या तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी खामगाव येथे घडली. अश्विनी सुधीर निंबोकार (वय २७), असे मृत तरुणीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी तरुणानेही शेगाव येथे रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

खामगाव शहरातील सनी पॅलेस भागात राहणाऱ्या भारत सलुनचे संचालक सुधीर निंबोकार यांची मुलगी अश्विनी व पातुर येथील सागर निंबोळे यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला होता. मात्र, पोटजात वेगळी असल्याने कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. याचा राग सागरच्या मनात होता. त्यातच अश्विनीसाठी आणखी स्थळ पाहणे सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा एमए इंग्रजीचा पेपर देण्यासाठी अश्विनी गेली होती. पेपर सोडवून १.३० वाजताच्या सुमारास ती परीक्षा केंद्रावरून बाहेर पडली. यावेळी संजिवनी कॉलनीमध्ये आरोपी सागर निंबोळेने धारधार शस्त्राने तिच्या चेहऱ्यावर आणि पोटावर वार केले. यामध्ये अश्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, आरोपीने शेगाव गाठून रेल्वेत चढला. त्या रेल्वेतून उडी घेऊन आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला अकोल्यात हलविण्यात आले. या प्रकरणी खामगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.