गेल्या २७ वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेत अभेद्य असलेली शिवसेना-भाजपा युती आज अखेर संपुष्टात आली. औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेवरुन भाजपाने ही युती संपुष्टात आणली आहे. आमदार सावे यांनी युती तुटल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपा आता महापालिकेत विरोधी बाकांवर बसणार आहे.

दरम्यान, भाजपाचे नगरसेवक उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून महापौर असलेले शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घडोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे आमदार सावे यांनी केली असून युती तुटल्याचेही त्यांनी जाहीर केले.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १६०० कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. तसेच राज्यात युती तुटली असताना औरंगाबादेत अद्याप युती कशी? अशी विचारणा लोक करीत असल्यामुळे उपमहापौर औताडे यांनी राजीनामा देत युती तुटल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे.

येत्या चार महिन्यांनंतर महापालिका निवडणूक होणार असल्याने भाजपाने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपा युतीतून बाहेर पडली असली तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असे महापौर घोडेले यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी निर्माण झाल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ही आघाडी पहायला मिळत आहे.