मुंबई : पूर, अवेळी पाऊस, चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत सुमारे २७ हजार कोटींचे पॅकेज जाहीर के ले आहे. करोनामुळे राज्याच्या तिजोरीला आधीच फटका बसला असतानाच मंगळवारी जाहीर झालेल्या मदतीच्या पॅकेजमुळे आर्थिक नियोजन अधिकच कोलमडणार आहे.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता ११ हजार ५०० कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षांकरिता सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात १० हजार २२६ कोटींची तूट अपेक्षित धरण्यात आली होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानेच खर्चावर बंधने आणण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने राज्याच्या तिजोरीवरील बोजा वाढला आहे. ११,५०० कोटींच्या आर्थिक मदतीने आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. आधीच महसुली उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे खर्चात वारेमाप वाढ झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. केंद्राकडून वस्तू आणि सेवा कराची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. या साऱ्याचा राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. वेतन, निवृत्ती वेतन, जिल्हा नियोजन, आदिवासी विभाग, आमदार निधीत कपात के ली जात नाही. विकास कामांवरच त्याचा परिणाम होतो.

* अवेळी पावसाचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी ऑक्टोबरमध्ये १० हजार कोटी.

*  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ११ हजार ५०० कोटी.

*  टाळेबंदीमुळे व्यवहार बंद पडल्याने रिक्षाचालक, हातगाडीमालक अशा विविध आर्थिकदृटय़ा दुर्बल घटकांना एप्रिलमध्ये ५४७६ कोटी.

*  निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना २६९ कोटी.

*  तौक्ते  चक्रीवादळाचा फटका २५२ कोटी.