पाणीटंचाईमुळे घेतलेल्या निर्णयाला नागरिकांचाही प्रतिसाद

प्रदीप नणंदकर, लातूर</strong>

शंभर वर्षांच्या इतिहासात पाण्याअभावी यंदा पहिल्यांदाच गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याच्या लातूर पालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. लातूरकरांकडून २८ हजार ७७५ गणेश मूर्ती महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या.  त्यात छोटय़ा २८ हजार २९० तर ४८५ मोठय़ा मूर्तीचा समावेश आहे.

सप्टेंबर अखेपर्यंतच नळाने पाणी देता येईल इतकाच पाणीसाठा लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात शिल्लक आहे. शहरातील जुन्या विहिरींचे कायमस्वरूपी अधिग्रहण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या विहिरींमध्ये दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात असे. मात्र यावर्षी पाणीच नसल्याने या पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येईल. त्यामुळे कोणीही गणपती मूर्तीचे विसर्जन करू नये. घरातल्या घरात मूर्तींचे जतन करावे किंवा इतरांना दान द्यावे. शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेकडे मूर्ती सुपूर्द कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते.

विसर्जनाच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिर, सार्वजनिक बांधकाम भवनच्या लगतची विहीर व मनपाचे परिवहन सभापती मंगेश बिराजदार यांच्या दीड एकर जागेत अशा तीन ठिकाणी मूर्ती जतन करण्यात आल्या. याची संख्या सुमारे २८,७७५ हजार एवढी होती.

गणेशमूर्ती विसर्जनातून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये रंकाळय़ाच्या शेजारी छोटे कुंड तयार करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित करू नयेत अशी यामागील भूमिका होती. त्यानंतर निर्माल्य पाण्यात न टाकता जमा करण्याची प्रथा सुरू झाली. पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड कचऱ्यामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. तर मराठवाडय़ात पाणी नसल्यामुळे समस्या आहेत. लातूरमध्ये यावर्षी प्रशासनाने जे पाऊल उचलले त्याची पुनरावृत्ती राज्य व देशात व्हायला हवी. यातून प्रदूषण रोखण्यास मदत होईल.    – अतुल देऊळगावकर, पर्यावरण अभ्यासक.