शासकीय निर्णयानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ० ते ५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या २८६ प्राथमिक शाळा बंद करून त्यामधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समिती बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये २७ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे यांनी दिला आहे. अल्प पटसंख्या असलेल्या शाळेत मुलांना सामाजिक व शैक्षणिक कौशल्ये संपादन होत नाहीत. त्यांना सहशालेय उपक्रमात सहभागी होता येत नाही. मुले एकलकोंडी होतात. त्यांच्या मानसिक विकासात अडचणी येतात. कला, क्रीडा, कार्यानुभव, हस्तकला, स्पर्धा, विविध गुणदर्शन आदी कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना वाव मिळत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या आनंददायी शिक्षणात अडथळे येतात, इत्यादी बाबींचा विचार करूनच कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने डिसेंबर २०१३ मध्ये घेतला. नजीकच्या शाळेत समायोजन होत नसेल तर विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान देऊन त्यांना दुसऱ्या शाळेत समायोजित करावे, असाही निर्णय झाला.

शासनाच्या वित्त विभागाने ३० जून व ८ ऑगस्ट २०१७ रोजी पाठवलेल्या पत्रांद्वारे, अल्प उपस्थिती व आवश्यकता तपासून शाळा बंद करण्यात यावी आणि त्या शाळेतील मुलांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करावे, अशी सूचना केली. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ० ते ५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.