देशभरासह राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी २८८ पोलीस करोनाबाधित आढळले असून, दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १३ हजार ४६८ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ४७८ जण, करोनामुक्त झालेले १० हजार ८५२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १३८ जणांचा समावेश आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १३ हजार ४६८ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ४२१ अधिकारी व १२ हजार ४७ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ४७८ पोलिसांमध्ये ३११ अधिकारी व २ हजार १६७ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १० हजार ८५२ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ९६ व ९ हजार ७५६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३८ पोलिसांमध्ये १४ अधिकारी व १२४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.