आवाजाची मर्यादा ओलांडून उपस्थित गणेशभक्तांच्या छातीत धडधड वाढविणाऱ्या डॉल्बीच्या दणदणाटात मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा मंगळवारी दुपारी १ वाजता संपला. तब्बल २९ तास यंदाची मिरवणूक सुरू राहिली असली, तरी मोठे सात गणपती वगळता अन्य मंडळांच्या मिरवणुका पहाटे ५ वाजताच संपल्या. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर आवाजाचा दणदणाट थांबला असला तरी मिरवणुका सुरूच होत्या.
पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गृहरक्षक दलाच्या जवानासह १ हजार पोलीस कर्मचारी सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत रस्त्यावर उतरले होते. उपअधीक्षक बजरंग बनसोडे, निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह चार उपअधीक्षक, १०० अधिकारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा, जलदकृती दलाची एक तुकडी असा बंदोबस्त तनात करण्यात आला होता. अधीक्षक दिलीप सावंत यांनी समक्ष हजर राहून बंदोबस्ताची पाहणी केली होती.
सोमवारी सकाळी ८.२० वाजता शहर पोलीस ठाण्याच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन गणेश तलावात केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. १६० सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. दिवसभर विसर्जन मिरवणूक मार्गावर तुरळकच मंडळांचे गणेशमूर्ती होते. मात्र सायंकाळी ७ वाजल्यानंतर मोठय़ा मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. ढोलताशासह डॉल्बी दणदणाटाने शहर रात्री १२ वाजेपर्यंत दुमदुमत होते.
रात्री एकाच वेळी मिरवणुका लक्ष्मी मार्केट परिसरात आल्याने गर्दी झाली होती. मराठा महासंघाच्या कमानीतून मोठे गणपती जात असताना रहदारीची कोंडी होऊन गणेश भक्तात चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला. या वेळी कोणीही पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. गणेशभक्तांना येण्या-जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याने मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. याच वेळी तांदूळ मार्केटकडून एकाच वेळी मंडळांच्या तीन-तीन मिरवणुकांच्या रांगा शिवसेनेच्या कमानीतून विसर्जन मिरवणूक मार्गात सहभागी होत होत्या. त्यामुळे तर प्रचंड गर्दीचा असह्य ताण सहन करावा लागला. गर्दीचे नियंत्रण करणारी कोणतीही यंत्रणा घटनास्थळी उपलब्ध नव्हती. यातच विविध स्वागत कक्षावरून ध्वनिक्षेपकावर केले जाणारे आवाहनही आवाजात भर टाकणारी ठरत होती.
विसर्जन मिरवणूक मार्गावर महापालिकेसह विश्व शांती, संभाजी तरुण मंडळ, शिवसेना, िहदू एकता आंदोलन, जनसुराज्य शक्ती, मनसे, रिपाइं, मराठा महासंघ आदींनी स्वागत कक्ष उभारले होते. खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, महापौर श्रीमती कांचन कांबळे, आयुक्त अजीज कारचे, प्रांताधिकारी हेमंत निकम, माजी आ. हाफीज धत्तुरे, युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष विश्वजित कदम आदींचे महापालिकेचे सदस्य, पदाधिकारी विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते.
गणेश तलाव येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री १२ वाजल्यानंतर मिरवणुकीतील वाद्य्ो, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद करण्यात आली. त्यानंतर ५ तासांत मिरवणुकीत सहभागी झालेल्या मध्यम व लहान मूर्तीचे गणेश तलावात शांततेत विसर्जन करण्यात आले. मोठय़ा सात गणपतींचे विसर्जन शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कृष्णाघाट येथे करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सगळ्यात शेवटी आज दुपारी १ वाजता संत रोहिदास मंडळाच्या १८ फुटी मूर्तीचे क्रेनच्या साहाय्याने अर्जुनवाड पुलावरून कृष्णा नदीत विसर्जन करण्यात आले.