कराड ग्रामीण पोलिसांनी काल तब्बल २९ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. बळीराम कांबळे नामक बनावट नोटांच्या प्रकरणात बहुचर्चित असलेल्या एकाच इसमाकडे एवढे मोठे आणि तेही बनावट नोटांचे घबाड सापडले. परिणामी इथे झटपट श्रीमंतीचे स्वप्न पाहणारी प्रवृत्ती किती फोफावली आहे यावर पोलिसांनीच ख-या अर्थाने प्रकाश टाकल्याचे म्हणावे लागेल. पोलिसांची बनावट नोटाप्रकरणी कराड विभागातील ही तिसरी कारवाई आहे. बळीराम कांबळेला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, अधिक तपास फौजदार रमेश गर्जे हे करीत आहेत.
सोमवारच्या रात्री कराड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान, ठिकठिकाणी वाहने व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झडती करण्याचे काम केले. त्यात वाघेरी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यास पोलीस पथक जाणार होते. याचवेळी नाकाबंदीपासून काही अंतरावर पोलिसांना पाहून भरधाव दुचाकी वळवून वेगाने निघून जाणा-या युवकाचा फौजदार रमेश गर्जे यांनी पाठलाग करून त्यास पकडले असता, या तरुणाचे नाव बळीराम कांबळे असे पुढे आले. त्याच्या झडतीत लाखाची रोकड सापडली. यावर या नोटा बनावट असल्याच्या संशयावरून तालुका पोलिसांनी बळीरामला तालुका पोलीस ठाण्यात आणले. येथे कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी बळीराम कांबळेकडे अधिक चौकशी केली आणि मंगळवारी सकाळी या नोटा स्टेट बँकेच्या अधिका-यानी तपासल्या असता, त्या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी बळीरामकडे कसून चौकशी केली. त्याच्या ओगलेवाडी (ता. कराड) येथील घरावर छापा टाकला असता, २९ लाख रुपयांच्या बनावट नोटांचे घबाड उघडय़ावर पडले. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. बळीराम कांबळे सांगलीतील बनावट नोटाप्रकरणी दोषी ठरलेला आरोपी आहे. तो या विभागात कोणास नोटा देण्यासाठी आला होता. आजवर त्याने किती नोटा खपवल्या. त्या कोणामार्फत बाजारात वितरित झाल्या. त्याचे नोटा बनवण्याचे तंत्र काय याचा पोलीस कसून शोध घेत असून, हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कराडला गतदशकात आर्थिक गुन्हेगारीचा विळखा पडला आहे. भौगोलिकदृष्टय़ा मध्यवर्ती ठिकाण राहिलेले कराड तालुका पातळीवरील महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ असून, कर्नाटक, गोवा राज्यासह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील लोकांची कराडला मोठी ये-जा राहिली आहे. जिथे जे काही चांगलं आणि जे काही वाईटात वाईट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो ते ठिकाण म्हणजे कराड अशीही या शहराची ओळख राहिली आहे. संमेलनं, आंदोलनं, अधिवेशनं, परिषदा यशस्वी करणारे अन् मुख्यमंत्र्यांचे गाव म्हणून कराडची ख्याती असताना, दुसरीकडे जवळपास सर्वप्रकारच्या गुन्हेगारीमुळे काळय़ा यादीवरही या शहराने नाव नोंदवले आहे. अलिकडच्या काळात या विभागातील पोलिसांची कामगिरीही ब-यापैकी राहिली असली तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.