पालघर जिल्ह्य़ातील आरोग्यव्यवस्थेवर करोनाकाळात प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले तरी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयअंतर्गत येत असलेली ग्रामीण रुग्णालये प्रसूतीसाठी वरदान ठरली आहेत. जिल्ह्य़ात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण २९४७ प्रसूती या रुग्णालयांमधून झालेल्या आहेत.

करोनाकाळात आरोग्यव्यवस्थेचा भर करोना उपचार केंद्रांवर अधिक असला तरी ग्रामीण भागातील रुग्ण व गरोदर माता यांचा विचार करून जिल्ह्य़ातील बारा आरोग्य संस्था इतर उपचारासाठी तसेच प्रसूतीसाठी उघडी ठेवण्यात आली होती. यादरम्यान या सर्व आरोग्यसंस्थांमधून अनेक मातांनी या सेवेचा लाभ घेतल्याने शासकीय आरोग्यसंस्थांमधून प्रसूती झाल्याच्या संख्येत गेल्या तीन महिन्यांत वाढ झाल्याचे दिसून आले.

या आरोग्यसंस्थांमधून सर्वाधिक सेवाचा लाभ पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात घेतला गेला आहे. यामध्ये डहाणू तालुक्यातील कासा व डहाणू उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सर्वाधिक प्रसूती झाल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल विक्रमगड मोखाडा, जव्हार रुग्णालयांमध्ये प्रसूतीची संख्या लक्षणीय आहे, तर मनोर, बोईसर, तलासरी, विरार, वाडा रुग्णालयांमधूनही गेल्या तीन महिन्यांत प्रसूती झालेल्यांची संख्या चांगली आहे.

करोनाकाळ सुरू झाल्यानंतर जिल्ह्य़ातील अनेक रुग्णालये करोना उपचार केंद्रांत रूपांतर करण्याचा प्रशासनाचा मानस होता. असे केल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण व गरोदर मातांसाठी आरोग्यव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होणार होता. मात्र तसे न करता पालघर ग्रामीण रुग्णालय वगळता सर्व आरोग्यसंस्था सामान्य उपचारांसाठी व प्रसूतीसाठी प्रशासनामार्फत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा मोठा फायदा या काळात रुग्णांसह गरोदर मातांना झाल्याचे पाहावयास मिळाले.

या काळात गरोदर मातांची काळजी व खबरदारी घेण्याचे मोठे आव्हान आरोग्यव्यवस्थेसमोर उभे होते. त्यामुळे या रुग्णालयांमधून गरोदर मातांच्या लसीकरणासोबत त्यांची नियमित तपासणी व इतर रुग्णांसाठीची सेवा या रुग्णालयांमधून जूनपासून अव्याहत सुरूच आहे. या रुग्णालयांमध्ये विशेषत: प्रसूतीसाठी स्त्री रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शस्त्रक्रियातज्ज्ञ यांची उपलब्धता आरोग्य

यंत्रणेमार्फत उपलब्ध करून दिली गेल्याने गरोदर मातांचा कल शासकीय आरोग्यसंस्थांकडे वाढला. तसेच करोनासदृश परिस्थिती निर्माण झाल्याने इतर रुग्णालये बंद असल्यामुळे प्रसूतीसाठी शासकीय आरोग्यसंस्थांना पसंती दिली गेली.

या प्रसूतीमध्ये नैसर्गिक प्रसूतीसह शस्त्रक्रिया प्रसूतीचाही समावेश आहे. पूर्वी या आरोग्यसंस्थांमधून खूप कमी प्रमाणात शस्त्रक्रियेने प्रसूती केली जात होती. मात्र स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध झाल्यामुळे या आरोग्यसंस्थांमध्ये गेल्या तीन महिन्यांत २८१ शस्त्रक्रिया प्रसूती करण्यात आल्या.

जागृतीमुळे यश

या सर्व आरोग्यसंस्थांच्या कार्यकक्षेत असलेल्या गरोदर  महिलांना आरोग्यव्यवस्थेमार्फत जोडून घेतले गेल्याने तसेच या शासकीय आरोग्यसंस्थांमधून  विविध तज्ज्ञ उपलब्ध करून दिले जात असल्याने शासकीय संस्थांमध्ये प्रसूतीच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत चालली आहे.

करोनाकाळात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या समन्वयाने जिल्ह्य़ातील आरोग्य संस्था या प्रसूती व इतर आरोग्य संदर्भ सेवांसाठी उघडी ठेवल्याने त्याचा मोठा लाभ येथील नागरिकांसह मातांना झाला. प्रसूती संख्याही लक्षणीय आहे.

– डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक