साखळी पद्धतीने गुंतवणूक होणाऱ्या पर्ल्स कंपनीत लातूरकरांनी गुंतवलेले तब्बल सोतीनशे कोटी रुपये अडकले आहेत. या कंपनीवर सेबीने केलेल्या कारवाईमुळे गुंतवणुकदार अडचणीत आले आहेत.
मागील १६ वर्षांपासून संपूर्ण जिल्हाभर पर्ल्सचा व्यवसाय साखळी पद्धतीने केला जात आहे. या कंपनीच्या साखळी योजनेत वीस हजारांच्या आसपास एजंट गुंतले आहेत. गुंतवणुकीवर आकर्षक योजना दाखवून गुंतवणूकदारांना भुलवले जाते. त्यामुळे कोटय़वधीची गुंतवणूक झाली. एक हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करणारे अनेक जण आहेत. दरमहा ५० हजार गुंतवणूक करणाऱ्या एजंटांना ४ टक्के कमिशन आहे. त्यामुळे एजंटही अधिक पसे मिळावेत, या साठी व्यवसाय जोमाने करीत. एजंटावर विश्वास ठेवून गोरगरिबांनीही पसे गुंतवले. आता मात्र या कंपनीची एसआयटीमार्फत चौकशी होत असल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
गुंतवणूकदारांनी तगादा लावल्यामुळे एजंटांचे मोबाइल बंद आहेत. गुंतवणूकदारांना नेमके काय उत्तर द्यायचे, हे एजंटांना सुचत नाही. कंपनीची चौकशी सुरू असल्यामुळे बँक व्यवहारही गोठवण्यात आले आहेत. चौकशी संपताच पसे मिळतील असे एजंट उसने आव आणून सांगत आहेत. गुंतवणूकदारांचे पसे मिळण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा आदर्श मत्री फाउंडेशनचे संतोष बिराजदार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.