अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यातून सावरत असलेल्या जिल्हावासीयांना नजीकच्या काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. एक दुष्टचक्र संपते न संपते, तोच नवीन संकट तीव्र स्वरूप धारण करीत आहे. २११ पकी १५६ प्रकल्पात सध्या ठणठणाट आहे. केवळ साडेतीन टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने यंदाचा उन्हाळा उस्मानाबादकरांना चांगलीच झळ देऊन जाणार आहे.
जिल्ह्यात एकूण २११ प्रकल्प आहेत. यात एक मोठा, १७ मध्यम, तर १९३ लघु प्रकल्प आहेत. मागील वर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. जिल्ह्याच्या पावसाची वार्षकि सरासरी ७७० मिमी आहे. प्रत्यक्षात केवळ ४२८ मिमी पाऊस नोंदविला गेला. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होऊ शकला नाही. १७ मध्यमपकी उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी व कळंब तालुक्यातील रायगव्हाण हे ३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. सहा प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. सहा प्रकल्पांची पातळी मृत साठय़ाच्या खाली आहे.
ग्रामीण भागातील जनावरांच्या पाण्याची भिस्त लघु प्रकल्पांवर असते. ऊन जसजसे वाढू लागले, तसतसे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. प्रकल्पांमधील पाणीपातळी वेगाने जोत्याखाली धावू लागली आहे. १९३ लघु प्रकल्पांपकी ७३ प्रकल्पांनी तळ गाठला. या प्रकल्पात केवळ मातीला पडलेल्या भेगाच शिल्लक आहेत. केवळ १६ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे, तर २८ प्रकल्पांमध्ये पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. तब्बल ७४ प्रकल्पांची पाणीपातळी मृतसाठय़ाच्या खाली गेली आहे. जोत्याखाली पाणीपातळी असलेल्या एकूण प्रकल्पांची संख्या ८१, तर कोरडेठाक प्रकल्प ७५ आहेत. म्हणजेच २११ पकी चक्क १५६ प्रकल्पात सध्या ठणठणाट आहे. उस्मानाबाद शहराला किमान आठ दिवसातून एकदा उजनी जलाशयातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात टंचाईच्या झळा अधिक गडद होऊ लागल्या आहेत.
आठवडय़ात पाणीसाठा निम्म्यावर
मागील आठवडय़ात जिल्ह्यातील प्रकल्पात असलेल्या उपयुक्त पाणीपातळीची स्थिती ७.८९ टक्के होती. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर उन्हाची काहिली चांगलीच वाढली. मागील ३ दिवसात पारा ३५ अंशांपुढे सरकला. परिणामी पाणीपातळीत झपाटय़ाने घट होत आहे. उपयुक्त पाणीसाठा आता केवळ ३.८७ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे.