अहमदनगरहून करमाळ्याच्या दिशेने येणाऱ्या फॉच्र्युनर मोटारीला कंटेनरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात फॉच्र्युनर गाडीतील तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास करमाळ्यानजीक मांगी गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातातील फॉच्र्युनर गाडी ( केए ३२ डी- ७७७) कर्नाटकातील असून अपघातात कर्नाटकातील कलबुर्गी येथील उद्योगक बी. जी. पाटील यांचे पुत्र अमित पाटील, त्यांचे सहकारी सुभाष व संतोष नाईक यांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की तिघा मृतांसह फॉच्र्युनर गाडीचा अक्षरश चेंदामेंदा झाला
होता.
फॉच्र्युनर गाडी नगरहून करमाळामाग्रे टेंभुर्णीच्या दिशेने येत होती. परंतु करमाळ्याच्या अलीकडे मांगी गावाजवळ समोरून येणारया कंटेनरची जोरदार धडक बसली. टेंभुर्णी-नगर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे तेथील वाहतूक वारंवार विस्कळीत होते. त्यातूनच अनेकवेळा छोटे-मोठे अपघात होतात. रविवारी हा भीषण अपघात झाल्यानंतर येथील रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. या अपघाताची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.