शेतात विहिरीच्या कडेला हरविलेली सोन्याची अंगठी शोधताना आईच्या देखत तीन चिमुकली भावंडे विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने जागीच मरण पावली. मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे ही हृदयद्रावक दुर्घटना घडली.
सिद्धी सचिन शेळके (वय ८), तृप्ती सचिन शेळके (वय ६) व पवनराजे सचिन शेळके (वय १) अशी दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. सचिन शिवाजी शेळके हे आपल्या शेतातील वस्तीवर पत्नी मंगल व मुलांसह राहात होते. सायंकाळी पत्नी मंगल ही सासरे शिवाजी शेळके यांची हरवलेली सोन्याची अंगठी शेतातील विहिरीजवळ शोधत होती. त्या वेळी तिची तिन्ही मुले विहिरीपासून काही अंतरावर बसली होती. अंगठी शोधताना मोठी मुलगी सिद्धी ही विहिरीजवळ गेली, विहीर पाण्याने काठोकाठ भरली होती. भोवताली वाढलेल्या गवतावरून सिद्धी ही घसरून थेट विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी आई मंगल हिने विहिरीत उडी मारली. आई विहिरीत पडल्याचे पाहून छोटी तृप्ती व चिमुकला पवनराजे या मुलांनीही विहिरीत उडी मारली. तिन्ही मुले विहिरीच्या तळाला गेली. मंगल हिला पोहता येत असल्यामुळे तिचे प्राण वाचले, मात्र तिच्या डोळय़ांदेखत तिन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला. विहीर खोल असल्याने ती मुलांना वाचवू शकली नाही.
सिद्धी, तृप्ती व पवनराजे यांचे मृतदेह काही वेळानंतर विहिरीत पाण्यावर तरंगत होते. गावक-यांच्या मदतीने तिन्ही मृत मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेची माहिती सागर शेळके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात कळविली असून, याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.