राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत २३१ नवे करोनाबाधित पोलीस आढळले असून, तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत ७ हजार ९५० पोलिसांनी करोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

करोना संकटावर मात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता त्यांना देखील दिवसेंदिवस अधिकच करोनाचा संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशातही झपाट्याने वाढत आहे. देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज सकाळी मागील २४ तासांमध्ये देशात ५२ हजार ०५० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली. यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत दिवसाला ५० हजारांपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे. देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. भारतातील करोना चाचणीने दोन कोटींचा पल्ला ओलांडला आहे.