इंदापूर तालुक्यातील निमसाखरनजीक ५४ फाटा-निमसाखर रस्त्यावर बोंद्रेवस्तीनजीक काल सोमवारी रात्री अज्ञात टँकरने रस्त्याच्या कडेला बसलेल्या चौघांना चिरडल्याने या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले; तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताबाबत वालचंदनगर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार निमसाखरनजीक बोंद्रेवस्तीजवळ राजेंद्र भानुदास गोरे यांच्या शेतामध्ये रात्री कूपनलिका खोदण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना बोंद्रेवस्तीवरील काहीजण तेथे कुतूहलापोटी कूपनलिका खोदत असताना बघत रस्त्याच्या कडेला बसले होते. रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ५४ फाटा- निमसाखर रस्त्याने निमसाखरकडे एक टँकर भरधाव वेगाने आला. या टँकरने रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघांना चिरडले. यातून एकजण बाजूला फेकला गेल्याने जखमी झाला. तर राजेंद्र भानुदास गोरे (३८), मोहन दशरथ बोंद्रे (५०) दोघेही रा. निमसाखर (बोंद्रेवस्ती) संजय भोंग (४०) रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर हे तिघेजण जागीच ठार झाले. तर कूपनलिका खोदणाऱ्या वाहनावरील सलापंतू (वय ३२) सध्या रा. निमगाव केतकी हा कामगार गंभीर जखमी झाला. सलापंतू सध्या इंदापूर येथील एका खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, निमसाखर येथे आज दुपारी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अंधाराचा फायदा घेऊन टँकरवाहनचालक बेदरकारपणे निघून गेला असून, वालचंदनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, इंदापूर तालुक्याला दुष्काळाच्या झळा मोठय़ा प्रमाणात जाणवत असून, शेतीच्या पाण्याचा व उभी पिके जगविण्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. या प्रयत्नात रात्री-अपरात्री कूपनलिका खोदण्याचे काम सुरू असते. पाण्याची पातळी भूगर्भातच खोलवर गेल्याने कूपनलिकेचे पाणी मिळवणे हे एक मृगजळासारखेच आहे. केवळ शंभरात १० ते २० कूपनलिकांनाच पाणी लागते. ७० ते ८० कूपनलिका कोरडय़ा जातात असा अनुभव आहे. बहुतांशी बोअरवेल खोदणारी वाहने तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून दरवर्षी येथे येतात.
शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होत असतात आणि अशा दुर्दैवी अपघातात पाण्यासाठी जीव गमावण्याचीही वेळ आली आहे.