अक्कलकोट, माळशिरस व मोहोळ या तीन ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या असून, या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र कोणालाही अटक केली नाही. निर्मल भारत अभियानांतर्गत शासनाकडून घरोघरी शौचालय उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असताना या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्याचा फटका महिलांना बसून त्यातून लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येते.
माळशिरस तालुक्यातील जांभूड येथे २५ वर्षांची विवाहित तरुणी घरात शौचालय नसल्यामुळे रात्री एकटी शौचासाठी उघडय़ा मैदानावर गेली असताना ज्ञानेश्वर हरिदास मोरे या तरुणाने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सदर विवाहितेचा विनयभंग केला. या घटनेने मानसिक धक्का बसलेल्या सदर विवाहितेने घरी येऊन घडलेला प्रकार सांगितला. तिने यासंदर्भात ज्ञानेश्वरविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलीस ज्ञानेश्वरचा शोध घेत आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील हत्ती कणबस येथे २५ वर्षांची विवाहिता दुपारी शेतात एकटी काम करीत असल्याचे पाहून तिला बळजबरीने पकडून लिंबाच्या झाडाच्या आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अंबाजी हणमंत पंचमागिरी (रा. सदलापूर, ता. अक्कलकोट) या नराधमाविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बलात्कारानंतर अंबाजीने सदर दुर्दैवी विवाहितेला कोठेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तो फरारी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
घरासमोर रात्री झोपलेल्या एका गरीब महिलेचा (२६) विनयभंग करण्यात आला. मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे घडलेल्या या  घटनेप्रकरणी याच गावातील अनिल सुनील गडदे या तरुणाविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.