लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात आणखी तीन करोनाबाधित रुग्णांचा बळी गेल्याची नोंद गुरुवारी झाली. सोबत ३९ नवे रुग्ण देखील वाढले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने सोळाशेचा टप्पा ओलांडून १६०७ वर पोहचली आहे. वाढती रुग्ण संख्या व मृत्यूच्या प्रमाणामुळे जिल्ह्यातील चिंताजनक परिस्थिती कायम आहे.

अकोला जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. नवे रुग्ण आढळून येण्यासोबतच दररोज करोनाबाधितांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून पुन्हा मृत्यूचे सत्र सुरू झाले. जिल्ह्यात विविध भागातील रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृत्यू रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील एकूण २८९ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २५० अहवाल नकारात्मक, तर ३९ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल रात्री उपचार घेतांना तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना २९ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा करोना सकारात्मक अहवाल आज प्राप्त झाला. आज दुपारनंतर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील रांजणगाव येथील एका ४५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. त्या २१ जून रोजी दाखल झाल्या होत्या. अकोट येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णही आज दुपारी दगावले. त्यांना २२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. करोनामुळे तीन मृत्यू आज नोंदवल्या गेले.

आज दिवसभरात ३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज सकाळी १९ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात १० महिला व नऊ पुरुष आहेत. त्यामध्ये तेल्हारा, खदान, गुलजारपुरा, हरिहर पेठ, अकोट फैल येथील प्रत्येकी दोन, तर वाशीम रोड, गाडेगाव, खैर मोहम्मद प्लॉट, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, हातरून, आळशी प्लॉट, काळा मारोती, अकोट व हामजा प्लॉट येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी २० जणांचे अहवाल सकारात्मक प्राप्त झाले. त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत. त्यामध्ये गंगानगर येथील चार जण, सिंधी कॅम्प, बाळापूर येथील प्रत्येकी तीन जण, गजानन नगर, अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर हरिहरपेठ, पातूर, घुसर, हातरुन, तारफैल व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

१२०० जणांनी करोनावर मात
जिल्ह्यात करोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आज दिवसभरात शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून १० तर कोविड केअर केंद्रातून २५ अशा ३५ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२०० रुग्णांनी करोनावर मात केली. त्याचे प्रमाण ७४.६७ टक्के आहे.

९८४६ अहवाल नकारात्मक
जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण ११५४९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १११८५, फेरतपासणीचे १४४ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २२० नमुने होते. आजपर्यंत एकूण ११४५३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ९८४६ आहे, तर सकारात्मक अहवाल १६०७ आहेत.