रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळपर्यंतच्या २४ तासात करोनामुळे आणखी तिघाजणांचा मृत्यू झाल्याने या महामारीमुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ६४ झाली आहे.

दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील ७० वर्षीय महिला रुग्णाचा व आणखी एका रूग्णाचा उपचार चालू असताना मृत्यू झाला, तर सती (चिपळूण) येथील ५८ वर्षीय रुग्णाचा रत्नागिरीत आणत असतानाच मृत्यू ओढवला. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६४ झाली आहे.

या कालावधीत जिल्ह्यात १०४  नवे सक्रीय करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात या रुग्णांची एकूण संख्या ५६७ झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या नवीन रुग्णांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि केशकर्तनालय चालकाचा समावेश आहे. तसेच,  नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये कामथे उपजिल्हा रूग्णालयातील (चिपळूण) ५०,  रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ३१ आणि कळंबणी (खेड) १३  रूग्णांचा समावेश आहे.

रविवार—सोमवारी मिळून ५२ रुग्ण बरे झाल्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्तांची संख्या १ हजार ३०४ झाली आहे. मात्र ४२६ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.