देशभरासह राज्यातील करोना संसर्गाचा वेग हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही करोनाबाधितांच्या संख्येत रोज भर पडत आहेच. आज दिवसभरात राज्यात ३ हजार २७७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या राज्याचा मृत्यू दर २.६३ टक्के एवढा आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७ लाख २३ हजार १३५ झाली आहे.सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० जण गृह विलगीकरणात आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ८२ हजार ९४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २३ हजार १३५ (१८.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० जण गृह विलगीकरणात आहेत. तर ७ हजार ५८६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. थंडी वाढत असल्यानं करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सर्तक राहण्याचं आवाहन केलं. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे.

पाश्चिमात्य देशात करोनाची दुसरी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधताना इशारा दिलेला आहे. “परिस्थिती आटोक्यात आलेली असं वाटत असलं तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे पंधरा दिवस हे आपल्याला अत्यंत कसोटीचे असणार आहेत. पाश्चिमात्य देशात पुन्हा संख्या वाढत आहेत. आकडेवारी पाहिली तर मी म्हणेन ही लाट नाही त्सुनामी आहे.” असं त्यांनी म्हटलं होतं.