नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असतानाच राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन असे राणेंनी म्हटले आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून मंगळवारी नारायण राणेंनी त्यांच्या खास शैलीत भाजपला शुभेच्छा दिल्या. ‘तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’ असा मजकूर असलेले पोस्टर नारायण राणे यांनी ट्विट केले. शिवसेनेला आता नाकच राहिले नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. गेल्या महिन्यात राणे यांच्या पक्षाने भाजपप्रणीत ‘एनडीए’त प्रवेश केला. नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असून त्यांच्याकडे कोणते खाते दिले जाते याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहे. राणे यांचा ११ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात समावेश होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राणे यांनी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर टीका केली आहे. आता राणेंना शिवसेनेकडून काय प्रत्यूत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात राणे – सेनामधील संघर्ष आणखी तापण्याची चिन्हे आहेत.