सोलापूरजवळ कारवाईत २८ व्यापारी, शेतकऱ्यांना अटक
सोलापूर शहरानजीक गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे चालणाऱ्या एका जुगार अड्डय़ावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३० लाखांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत २८ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाली. काही व्यापारी व शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवी पेठेसह मुरारजी पेठेत अवैध धंदे व इतर गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या सचिन ज्ञानदेव बावळे (३८, रा. लोभा मास्तर चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) व सरदार शेख (रा. कल्पना टॉकिजजवळ, सोलापूर), बापू प्रभाकर जाधव (रा. सात रस्ता, सोलापूर) यांच्यासह २८ जणांना या कारवाईत अटक करण्यात आली. यावेळी ७८ हजार ५०० रुपये रोख, २५ मोबाइल संच तसेच २१ लाख ७० हजार रुपये किमतीची पाच चारचाकी वाहने व दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
सोलापूर शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणारे शहरानजीक ग्रामीण हद्दीत आपले बस्तान बसवत आहेत. यात मार्डी, भोगाव, तळे हिप्परगा, गुळवंची, उळे इत्यादी गावे अवैध धंद्यांसाठी चर्चेत येत आहेत. काही महिन्यांपूर्वी मार्डी येथे अरूण रोडगे या कुविख्यात गुन्हेगाराच्या जुगार अड्डय़ावर पोलिसांनी छापा घालून सुमारे पाऊण कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला होता. रोडगे याचे अवैध धंदे पूर्वी सोलापूर शहरात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत असत.
गुळवंची येथे राजरोसपणे जुगार अड्डा सुरू असून, त्याठिकाणी सोलापूरसह शेजारच्या उस्मानाबाद व कर्नाटकातून व्यक्ती जुगार खेळण्यासाठी येतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे पहाटे छापा टाकला असता २८ जण सापडले. संजय नवगिरे याच्या शेतात हा जुगार अड्डा चालत होता. दीपक देवेंद्र तोष्णीवाल (४९) बसवराज बसण्णा कोठय़ाळ (३५), राजकुमार सिद्रामप्पा वारद (५८, तिघे रा. गुलबर्गा, कर्नाटक), बंदेनवाज अलीसाहेब सिंदगीकर (२८, रा. विजापूर, कर्नाटक), निंगोडा हणमंत बिराजदार (२८), सिध्दण्णा मलकारी बिराजदार (२७) राजू बसवंत पाटील (२५, तिघे रा. मंगळवेढा), बसवराज शरणप्पा जारगल (५२, रा. भवानीपेठ, सोलापूर), नानासाहेब बाबासाहेब मोरे (४०, रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांचा अटक आरोपींमध्ये समावेश आहे. यातील बहुसंख्य व्यक्ती व्यापारी व बडे शेतकरी आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.