पर्यावरण संवर्धन व त्यातून रोजगार निर्मिती असा प्रकल्प महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबवला जात आहे. चालू वर्षांत जिल्ह्यात तीस लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत असलेली गावे, पर्यावरण संतुलित प्रस्तावित ग्रामपंचायती, पाच हजारांहून अधिक लोकसंख्येची गावे या ठिकाणी ही लागवड करण्यात येणार असून रस्त्यांच्या दुतर्फा आणि गायरानातील जागेवर लागवडीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. विविध रोपवाटिकांमध्ये तीस लाख रोपे उपलब्ध झाली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबवल्या जातात. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाला बाधा निर्माण होत आहे. अलीकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे रुंदीकरणामुळे तोडली गेली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम राबवली जाते. यावर्षी पर्यावरण संवर्धन व त्यातून रोजगार निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबवला जात आहे. या अंतर्गत ३० लाख रोपांची लागवड करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. रोपांची लागवड करण्यासाठी ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. त्या गावांची प्रामुख्याने निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यावरण संतुलित प्रस्तावित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे. या बरोबरच खासगी जागांवरही रोपांची लागवड केली जाणार आहे. प्रत्येक गावातील रस्त्याच्या दुतर्फा ही लागवड करून या रोपांच्या संवर्धनासाठी मजूर ठेवले जाणार आहे. गायरान जागेतही रोपांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच यातून रोजगार निर्मितीही करण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन हजार व्यक्तींना किमान शंभर दिवसांचा रोजगार या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मजुराला १८१ रुपये प्रतिदिन रोजगार देण्यात येणार आहे. प्रशासकीय पातळीवर रोप लागवडीसाठी प्रयत्न केले जात आहे. ज्या ज्या रोपवाटिकांमध्ये ही रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत त्याअंतर्गत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील गावांमध्ये रोप लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.