भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात ३० लाख पत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला असून सावंतवाडी तालुक्याच्या वतीने सहाशे पत्रे पोस्ट खात्याकडे सुपूर्द केली. अन्यथा लोकसभा निवडणुकांत शिक्षक जाब विचारतील अशा इशारा दिला.

सावंतवाडी पोस्टाचे हेड पोस्टमन बाळकृष्ण तेंडुलकर, पोस्टमन सरोज तेली, अजय कोळंबेकर यांच्याकडे सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सहाशे पत्रे सुपूर्द केली. या वेळी प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष म. ल. देसाई, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम होगई, सरचिटणीस बाबाजी झेंडे, सौ. नूतन पालवे, अमोल पाटील, महेश सावंत, नंदकिशोर कवठणकर, अमोल आपटे, लक्ष्मण धुरी, ज्ञानेश्वर सावंत, संजय शेडगे, दशरथ सावंत, अर्जुन रणशूर, दिलीपकुमार गावित, संजय परब, बापूशेट कोरगावकर, रवींद्रनाथ गोसावी, दत्ताराम सावंत, विजय गावडे, जयप्रकाश पेडणेकर, विलास फाले, आदिती सावंत, नेहा सावंत, वंदना सावंत, उज्ज्वला धुरी, सुजाता सावंत, शुभेच्छा गवस, प्रीमा माधव, गीता सुतार, शिवलाल पावरा, दिलवरासिंग पावरा उपस्थित होते.भारतीय प्राथमिक शिक्षक  संघाचे देशभरात ३५ लाख सभासद आहेत. त्यापैकी ३० लाख सभासद पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्ष नेत्यांना पोस्ट कार्डाद्वारे शिक्षकांच्या समस्यांबाबत लक्ष वेधणार आहेत. त्यात जुनी पेन्शन त्वरित लागू करावी, सहावा वेतन आयोगातील अडचणी दूर कराव्यात. तसेच सातवा वेतन आयोग लागू करावा व शिक्षकांना समान कार्यासाठी समान वेतन लागू करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत, असे माजी जिल्हाध्यक्ष महादेव देसाई यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातून ६०० पत्रं पाठविण्यात आली. देशभरातून ३० लाख पत्रं पाठवून केंद्र सरकारला जाग आणली जात आहे. या मागणीला पंतप्रधानांनी किंवा केंद्र सरकारने दाद दिली नाही तर दिल्लीत मोर्चा नेण्यात येईल तसेच येत्या सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत शिक्षक कर्मचारी जाब विचारतील, असेही महादेव देसाई म्हणाले.

महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग वारंवार परिपत्रके काढून त्रास देत आहे. त्यामुळे शिक्षक आधीच नाराज आहेत. जुनी पेन्शन आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ देशभरात सक्रिय बनला आहे, असे महादेव देसाई म्हणाले. या वेळी प्राथमिक शिक्षक संघाचे सभासद उपस्थित होते.