जेजुरी (वार्ताहर) पुरंदर तालुक्यात करोनाचे ३० रुग्ण झाले असून त्यातील एकट्या सासवडमध्ये १४ रुग्ण आढळले आहेत. यातील ९ रुग्ण गेल्या चार दिवसातील आहेत. सासवडमध्ये करोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सासवडमध्ये ४ दिवसाचा जनता लॉकडाउन जाहीर केला आहे.

तालुक्यातील ३० रुग्णांमध्ये बहुतांशी करोनाबाधित रुग्ण हे मुंबई पुणे आदी भागातून आल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत तालुक्यामध्ये ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातून पुण्याला नोकरीनिमित्त अप डाऊन करणारी मंडळी भरपूर असून करोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अमलबजावणी करणे गरजेचे आहे. या मंडळींनी इतर लोकांमध्ये न मिसळण्याची काळजी घ्यावी लागेल असे तज्ञ्ज डॉक्टरांचे मत आहे.

सध्या तालुक्याच्या अनेक भागात तोंडाला मास्क न लावता अनेकजण बाहेर हिंडतात. तर काही ठिकाणी कोरोनाची तमा न बाळगता लोक समूहाने गप्पा मारताना दिसतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन जनतेमध्ये परत कोरोनाची काळजी घेण्यासंदर्भात प्रचार मोहीम राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सासवडमध्ये राहून हडपसर भागातील बँकेत काम करणारा एक कर्मचारी व सासवडमधीलच २ व्यापाऱ्यांसह त्यांच्या घरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आता तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३० वर पोहोचल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.