पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेला अनुपस्थित उमेदवारांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत १० ते २० टक्के उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहतात. मात्र रविवारी झालेल्या परीक्षेला ३० ते ३५ टक्के  उमेदवार अनुपस्थित होते.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी राज्यभरातील केंद्रांवर  झाली. २०१९ ची ही परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव, एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेली अंतरिम स्थगिती अशा कारणांमुळे चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. १४ मार्चला होणारी परीक्षा आयत्यावेळी पुढे ढकलल्याने राज्यभरात उमेदवारांनी आंदोलन केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांत परीक्षा घेण्यात येईल असे उमेदवारांना आश्वस्त केले होते. त्यामुळे एमपीएससीकडून २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार रविवारी राज्यभरात परीक्षा झाली.

करोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे आयोगाने परीक्षा केंद्रावर उमेदवारांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती निश्चित केला होती. त्याप्रमाणेच ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी २ लाख ६२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३० ते ३५ टक्के  उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.

५० उमेदवारांची पीपीई किट वापरून परीक्षा

करोना सदृश लक्षणे असलेल्या उमेदवारांना स्वसंरक्षण साहित्य (पीपीई किट) घालून परीक्षा देण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली होती. मात्र या पीपीई किटचा विशेष वापर झाला नाही. राज्यभरात पीपीई किट घालून परीक्षा दिलेले उमेदवार ५० पेक्षा जास्त नसल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली.

सर्वसाधारण परिस्थितीत अर्ज भरलेल्यांपैकी १० ते २० टक्के  उमेदवार परीक्षा देत नाहीत. मात्र रविवारी झालेल्या परीक्षेच्या उपस्थितीचा अंदाज घेतल्यावर ३० ते ३५ टक्के उमेदवार अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. अनुपस्थितीचा टक्का वाढण्याच्या कारणांची कल्पना नाही.

— सुनील अवताडे, सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग