News Flash

वाहतुकीचा रोजच खोळंबा

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

सुहास बिऱ्हाडे/कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : उपनगरीय रेल्वेसेवा बंद असल्याने मुंबईत जाण्यासाठी नागरिकांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या  संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच महामार्गावरील रखडलेल्या पूल आणि मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यामुळे वसईहून मुंबईला जाण्यासाठी तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे.

वसई-विरार शहर तसेच पालघर जिल्ह्य़ातील लाखो प्रवासी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने निघतात. करोनाकाळात संसर्ग रोखण्यासाठी उपनगरीय रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीस टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. आता टाळेबंदीचे काही नियम  शिथिल करण्यात आल्याने काही उद्योगधंदे, शासकीय आणि खासगी कार्यालये आणि आस्थापना सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील लाखो प्रवाशांना उपनगरी रेल्वेऐवजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी खासगी गाडय़ा, एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढली असताना दुसरीकडे महामार्गावर मालजीपाडा उड्डाणपुलाचे रखडलेले काम आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहनधारकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा फटका

महामार्गाच्या लगतच मालजीपाडा, ससूपाडा, ससूनवघर, बोबतपाडा अशी गावे आहेत. या गावातील नागरिकांना दररोज महामार्ग ओलांडूनच धोकादायक प्रवास करावा लागत होता. यासाठी गेली अनेक वर्षे येथील नागरिक उड्डाणपूल व पादचारी पुलाची मागणी करीत आहेत. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर साधारण दीड महिना पुलाचे काम सुरू राहिले. करोनाकाळात हे काम बंद करावे लागले.

मेट्रोच्या कामाला विलंब होत असल्याचा आरोप

दहिसरवरून काशिमीरामार्गे भाईंदर पश्चिम येथे मेट्रो रेल्वेच्या दहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. ठाण्याला जाणारी मेट्रोही प्रस्तावित असून तीदेखील काशिमीरामार्गे कासारवडवली येथून जाणार आहे. या मेट्रोच्या कामाचे साहित्य येथे पडून आहे. हे काम संथगतीने होत असल्याचा आरमेप करण्यात येत आहे. एकाच वेळी पूल आणि मेट्रोचे काम, त्यातच वाहने वाढल्याने ही वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. हा मेट्रोचा मार्ग २०२४ मध्ये खुला होणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे तरी मेट्रोचे काम चालणार आहे. पुलाचे काम नव्याने सुरू झाल्यास सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, उपनगरीय रेल्वेसेवा सुरू झाल्यास वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मेट्रोच्या कामाला विलंब होत असल्याचा आरोप मेट्रोने फेटाळून लावला आहे. हे काम विहित वेळेच्या मुदतीतच पूर्ण होईल, असा विश्वास  मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक बी.जी. पवार यांनी व्यक्त केला आहे.  खोदकामामुळे वाहनचालकांना तासन्तास येथे वाहतूक कोंडीत रखडत राहावे लागत असल्याचे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

मालजीपाडा येथील उड्डाणपुलाचे काम सद्य:स्थितीत मनुष्यबळाच्या अभावी थांबले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होतीच परंतु मागील काही दिवसांपूर्वी माती टाकून तिसरी मार्गिका सुरू करून देण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या मिटली आहे. 

– अमित साठे, सहायक अभियंता, आयआरबी

महामार्गावरील वाहनांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे या भागात दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

– विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:57 am

Web Title: 30 percent vehicles increase on national highway zws 70
Next Stories
1 तारापूरमध्ये घुसमट कायम
2 रोप लागवडीत पालघर जिल्हा राज्यात आघाडीवर
3 वाढवण बंदराला ग्रामस्थांचा विरोधच
Just Now!
X