24 September 2020

News Flash

वाडय़ाच्या जलविज्ञान प्रकल्प कार्यालयाला घरघर

५५ पैकी ३० पर्जन्यमापक उपकरणे बंद; पावसाच्या नोंदी करण्यात अडचणी

५५ पैकी ३० पर्जन्यमापक उपकरणे बंद; पावसाच्या नोंदी करण्यात अडचणी

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : जलविज्ञान प्रकल्प नाशिक अंतर्गत गेल्या ५० वर्षांपासून वाडा येथे जलविज्ञान प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत असलेली पालघर जिल्ह्यातील ५५ पर्जन्यमापक उपकरणांपैकी ३० पर्जन्यमापक उपकरणे बंद पडली आहेत. सुरू असलेल्या २५ पर्जन्यमापक उपकरणांपैकी काही उपकरणांवर रोज संपर्क होत नसल्याने तेथील पावसाच्या नोंदी मिळत नाहीत. पर्जन्यमापन उपकरणांची ही दुरवस्था असतानाच वाडय़ाच्या या उपविभाग जलविज्ञान प्रकल्प कार्यालयात निम्मेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे या प्रकल्प कार्यालयाला अखेरची घरघर लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाडय़ातील जलविज्ञान प्रकल्प उपविभागाच्या कार्यालयाचे उपअभियंता पी. बी. पठाडे यांच्याकडे वाडय़ासह नाशिक व ठाणे येथील उपविभाग कार्यालयांचा पदभार आहे. वाडा कार्यालयासाठी एकुण मंजुर कर्मचाऱ्यांची संख्या १९ असताना प्रत्यक्ष या ठिकाणी फक्त आठ कर्मचारी कार्यरत आहेत. शाखा अभियंताच्या पाच जागा असताना तीन शाखा अभियंता कार्यरत आहेत. लिपिक पदाच्या चारही जागांवर कर्मचारी असले तरी शिपाई पदाच्या तिन्ही जागा रिक्त असल्याने शिपायाची झाडू मारणे, साफसफाई करणे आदी सर्व कामे या लिपिकांनाच करावी लागतात. या कार्यालयासाठी वाहन आहे. मात्र चालकाची जागा रिक्त असल्याने वाहन तसेच पडून आहे. चौकीदाराच्या दोन्ही जागा रिक्त असल्याने मोकाट जनावरे व श्वानांचा सर्रास वावर येथे पहावयास मिळतो. दोन वर्षांपूर्वी या कार्यालयातून संगणक संच चोरीस गेला आहे.

दमणगंगा ते वैतरणा या दोन प्रमुख नद्यांसह या नद्यांना जोडणाऱ्या उपनद्यांच्या परिसरात पडणाऱ्या पावसाच्या दररोज नोंदी घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जलविज्ञान प्रकल्पाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे काम वाडा जलविज्ञान प्रकल्प कार्यालयाकडून केले जाते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या कार्यालयांतर्गत असलेले उपकरणे विविध कारणास्तव बंद पडली आहेत. उर्वरित सुरू असलेल्या २५ उपकरणांपैकी ८ ते १० उपकरणांवर रोजच्या नोंदी संपर्काअभावी मिळत नाहीत.  त्यामुळे पावसाच्या नोंदी होत नसून नेमका किती पाऊस पडला आहे हे समजण्यात अडचणी येत आहेत.

दमणगंगा खोरे आणि वैतरणा खोरे येथील पाऊस मोजण्यासाठी लवकरच पर्जन्यमापन करणारी जुनी उपकरणे बंद करून नऊ ठिकाणी नव्याने उपकरणे उभारण्यात येणार आहे.

– ए. के. राणे, शाखा अभियंता, जलविज्ञान प्रकल्प उपविभाग, वाडा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:22 am

Web Title: 30 rain gauge instrument closed in palghar district zws 70
Next Stories
1 बिकट परिस्थितीवर मात करून यवतमाळमधील तिघे ‘यूपीएससी’त यशस्वी
2 सांगलीत कालचा ‘करोना गोंधळ’ बरा होता!
3 पालघरमध्ये संततधार सुरूच
Just Now!
X