बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये ३० वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित महिला रात्री रस्त्यावरुन जात असताना मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्या महिलेवर अत्याचार केला. बलात्कारानंतर नराधम घटनास्थळावरुन पसार झाला असून या घटनेने गावात संताप व्यक्त होत आहे.
मेहकर तालुक्यातील जानेफळ गावातील एका ढाब्यावर ३० वर्षीय महिला काम करते. रविवारी रात्री पीडित महिला महामार्गावरुन चालत जात होती. यादरम्यान मोटरसायकलवरुन आलेल्या एका व्यक्तीने पीडित महिलेला बांधून गाडीवर बसवले आणि त्यानंतर रस्त्यालगतच्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर पीडित महिलेला तिथेच सोडून नराधमाने पळ काढला. या घटनेने पीडित महिलेला मानसिक धक्काच बसला होता. सोमवारी रात्री पीडितेने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र नराधमाच्या गाडीचा नंबर किंवा अन्य कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या नराधम आरोपीला शोधण्याचे आव्हान आता मेहकर पोलिसांसमोर आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 5:52 pm