सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन सहा हजार मेट्रिक टनावरून दहा हजार मेट्रिक टन वाढविणे, ५० हजार लिटर इथेनॉल निर्मितीवरून क्षमता एक लाख लिटर करणे, सहवीज निर्मिती २३ मेगावॅट वरून ५० मेगावॅट करणे हे विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. सुमारे ३०० कोटी रुपयाची उभारणी करून हे काम पुढच्या वर्षी चालू करण्याचा व्यवस्थापक मंडळाचा मानस आहे, अशी माहिती अध्यक्ष नवीद हसन मुश्रीफ यांनी दिली.

कागल तालुक्यातील या खासगी साखर कारखान्यात नव्याने रुजू झालेले सरव्यवस्थापक संजय श्यामराव घाटगे यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते घाटगे यांचे स्वागत झाले.

यावेळी नवीद मुश्रीफ म्हणाले, कारखान्याने दोन महिन्यांपूर्वी एफआरपी संपूर्ण दिली आहे. परंतु गेल्या हंगामामध्ये उसाच्या उपलब्धतेसाठी प्रतिटन १०० रुपये जादा देण्याचे जाहीर केले होते. त्यातील गणपती उत्सवाला ५० रुपये देणार असून उर्वरित रक्कम दसरा – दिवाळी सणाला देणार आहोत. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना वेतन मंडळाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. आंबेओहोळ व नागणवाडी हे दोन सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे उसाची मोठी उपलब्धता होणार आहे. त्यामुळेच कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन सहा हजार मेट्रिक टनावरून दहा हजार मेट्रिक टन इतकी वाढवली जाणार आहे.