सोलापूर : सोलापूर शहरातील वाढती वाहतूक समस्या विचारात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दोन उड्डाण पुलांसाठी ८७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र त्यासाठी सोलापूर महापालिकेला आवश्यक भूसंपादन करावे लागणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून ३०० कोटींचा निधी मंजूर केल्याची व त्या बाबतचा आदेश काढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सोलापूर शहर व जिल्हय़ातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल साडेचार तास बैठक घेतली. नंतर या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोलापूर शहरात मुंबई-हैदराबाद महामार्गाच्या बाहय़वळणावर पुणे चौत्रा नाका ते बोरामणी नाका ते विजापूर महामार्गावरील छत्रपती संभाजी कंबर तलावापर्यंत दोन उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रिया महापालिकेने पूर्ण करायची आहे. त्यासाठी लागणारा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय देशमुख यांनी शासनाकडे केली होती. त्या बाबतचा पाठपुरावा केला जात असताना त्या बाबत अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूसंपादनासाठी शासनाकडून ३०० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे व त्या बाबतचा आदेश जारी करण्यात आल्याचे सांगितले.

सुमारे ४५० कोटी खर्चाच्या उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब लागत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी त्याचा जाब महापालिका प्रशासनाला विचारला. आता ही निविदा प्रक्रिया सी फॉर्म पद्धतीने केली जावी. त्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी आणि पुढील कामकाजाला सुरुवात करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सोलापूर शहरातील अमृत योजनेतून उभारण्यात येणारी शहरी भुयारी गटार योजना, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा टर्सरी ट्रिटमेंट प्रकल्प आणि पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाला आहे. आणखी निधीची गरज भासल्यास नगरोत्थान अभियानातून निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शविली.