दिगंबर शिंदे

पूर ओसरल्यानंतर निवारा केंद्रातून घरी परतताच पूरग्रस्त नागरिकांना घरात अडगळीच्या जागेत मगरी व सापांचे दर्शन मोठय़ा प्रमाणात होत असून आतापर्यंत सर्पमित्रांनी आजअखेर एकटय़ा सांगली शहरात ३००  हून अधिक घोणस, नाग, मण्यार हेअतिजहाल विषारी सर्प पकडून अधिवासात सोडले आहेत. तर ग्रामीण भागातही वाहून आलेल्या कडब्यात आणि अडगळीच्या जागीही मोठय़ा प्रमाणात सापांचे अस्तित्व आढळून येत आहे.

आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सापांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल ३०० हून अधिक विषारी सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे.

आठ दिवसांच्या महापुराने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या मगरी व सर्पानी घराशेजारी अडगळीच्या जागी आसरा घेतला आहे. सांगलीच्या नागरी वस्तीत घुसलेल्या दोन मगरींना पकडून पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. तर दुसरीकडे पुरासोबत आलेले अनेक साप पाण्यात बुडालेल्या घरांमध्ये शिरले आहेत. सर्प मित्रांची मदत घेऊन या सापांना बाहेर काढावे लागत आहे.

महापुरानंतर रोज साधारणत: ७० साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडले गेले. याशिवाय काही कासवेही नागरी वस्तीत आली होती. त्यांनाही पुन्हा नागरी वस्तींपासून दूर सोडण्यात आले. यासाठी सर्पमित्र आणि प्राणिमित्रांनी मदत केली. प्राणिमित्रांनी अनेक प्राण्यांना नागरी वस्तीपासून दूर नेऊन त्यांच्या अधिवासात सोडल्याचे सांगितले.

‘नेचर क ॉन्झर्वेटिव्ह सोसायटी’च्या कार्यकर्त्यांनी महापुरातून  नागरी वस्तीत आसऱ्याला आलेल्या सापांना घरांतून पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित स्थळी सोडले आहे. या सापांमध्ये घोणस, मण्यार आणि नाग अशा विषारी सर्पापासून ते बिनविषारी असलेल्या धामण, तस्कर अशा सापांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी मगरीही आढळून आल्या आहेत.