पुणे विद्यापीठ आणि येथील केटीएचएम महाविद्यालय यांच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित विभागीय आविष्कार स्पर्धेत जिल्हा व शहरातील ११७ महाविद्यालयांमधील ३०० विद्यार्थी व शिक्षकांनी भाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते झाले. देशात संशोधन संस्कृती निर्माण करून बालवयातच मुलांची गुणवत्ता, कल्पना आणि बुद्धिमत्तेला वाव दिल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक तयार होऊ शकतील, असे मत डॉ. गाडे यांनी या वेळी मांडले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार अध्यक्षस्थानी होत्या. पुणे विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. आर. जी. जायभाये, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. आर. बी. टोचे व्यासपीठावर होते. देशात संशोधनावर पाण्यासारखा पैसा खर्च होत असतानाही पेटंट, संशोधनाचा दर्जा खालावत चालला असल्याची खंत कुलगुरू डॉ. गाडे यांनी व्यक्त केली. विज्ञानासह सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली असली तरी मानवाच्या ९५ टक्के समस्या अनुत्तरितच आहेत. यावरून संशोधनाचे महत्त्व अधोरेखित होते. लहान मुलांमध्ये निर्मिती क्षमता व कल्पनाशक्ती अफाट असते. त्यांना फक्त योग्य संधी व मार्गदर्शनाची गरज असते. प्राध्यापक व तज्ज्ञांनी हे काम करावे. आविष्कार स्पर्धेत पारितोषिक न मिळालेल्या परंतु वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पांनाही विद्यापीठ न्याय देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नीलिमा पवार यांनी आविष्कारसारख्या स्पर्धा शालेय स्तरावर घेतल्यास चांगले संशोधक तयार होतील. मात्र त्यासाठी कॉपीची प्रवृत्ती नको, असे मत मांडले. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आविष्कार स्पर्धा ही वेगळेपण सिद्ध करण्याची संधी असल्याचे नमूद केले. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञान, क्षमता, दूरदृष्टीचा समाजासाठी उपयोग करावा, विद्यार्थ्यांनी उपयुक्त व वेगळे प्रयोग केल्यास त्यांचे पेटंट घेण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करेल, असे मत मांडले. डॉ. आर. जी. जायभाये यांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे आवाहन केले. प्रा. विनया केळकर यांनी आभार मानले.