नोटाबंदीला ५० दिवस पूर्ण होत आले आहेत. जनतेकडील चलनाचा ओघ आटला असल्याचे बोलले जात असताना, भाविकांनी शिर्डीतील साईचरणी तब्बल ३१ कोटी ७३ लाख रुपये आणि तीन किलो सोने दान केल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर देशभरात चलनकल्लोळ सुरू झाला. जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या बँका आणि एटीएमबाहेर रांगा लागल्या होत्या. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेल्या चलन समस्येवरून विरोधकांनी धारेवर धरले असताना, परिस्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. अद्यापही लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. असे असताना मात्र, साईचरणी देणगीचा ओघ काही कमी झालेला दिसून येत नाही. गेल्या ५० दिवसांत साईचरणी तब्बल ३१ कोटी ७३ लाख रुपये आणि ३ किलो सोने दान करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत एबीपी माझा या वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाच्या माध्यमातून ३ कोटी १८ लाख रुपये दान स्वरुपात जमा झाले आहेत.

भाविकांनी साईचरणी पैशांसोबत सोन्या-चांदीचे दागिनेही दान केले आहेत. त्यात २ किलो ९०० ग्रॅम सोने आणि ५६ किलो चांदीचा समावेश आहे. दानपेटीत १८ कोटी ९६ लाख, तर देणगी खिडकीवर चार कोटी २५ लाख रुपये जमा झाले आहेत. सहा कोटी ६६ लाख रुपये ऑनलाईन देणगी दिली असून, डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे दोन कोटी ६२ लाखांची देणगी देण्यात आली आहे. प्रसादालय मोफत अन्नदान योजनेच्या माध्यमातून १६ लाख रुपयांचे दान मिळाले आहे. तर चेक आणि डीडीच्या स्वरुपात ३ कोटी ९६ लाखांचे दान साईचरणी केले आहे. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा जमा झाल्या असून, ३ कोटी ८० लाखांच्या नव्या नोटा साईचरणी दान केल्या आहेत.