सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सातत्याने सुरू असलेला अर्जांच्या प्रवाहाचे आता महापूरात रुपांतर झाले असल्याचे दिसत आहे. राज्यातील मेगाभरतीच्या रूपाने ही बाब समोर आले आहे. जानेवारीपासून ते आजतागायत ३१ हजार ८८८ जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजेच साधारणपणे एका जागेसाठी १०० अर्ज आलेले आहेत. ही परिस्थिती विचार करायला लावणारी आहे.

११.२ लाख अर्जदारांपैकी एक तृतीयांश अर्जदार ग्रामविकास विभागात रिक्त असलेल्या १३ हजार ५१४ जागांसाठी इच्छुक आहेत. तर, पशुधन विभागातील ७२९ रिक्त जागांसाठी मोठी चढाओढ दिसत आहे. या ठिकाणच्या एका जागेसाठी किमान ४५२ अर्ज आलेले आहेत. यानुसार एकूण ३.३ लाख अर्ज विभागाकडे दाखल झालेले आहेत.एकूण १३ विभागांमधील ३१ हजार ८८८ जागांमध्ये प्रामुख्याने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी दर्जाच्या पदांसाठी अर्ज आलेले आहेत. या विभागांमध्ये कृषि, पशुधन, वन विभाग, वित्त विभाग, मत्सविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भू आणि जल संवर्धन विभाग व ग्राम विकास विभाग इत्यादींचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेराजगारीचा मुद्दा उचलत, ७२ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा केली होती. या जागा आगामी दोन वर्षात विविध टप्प्यात भरल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे ही प्रक्रिया काहीशी मंदावली होती.वनखात्यामधील ९०० रिक्त जागांसाठी तब्बल ४ लाख अर्ज दाखल झालेले आहेत. याचप्रमाणे अन्य विभागांमधील रिक्त जागांसाठी देखील लाखांच्या घरात अर्ज दाखल झालेले आहेत. ज्यामध्ये महसूल विभागातील तलाठी व महसूल अधिकाऱ्यांच्या १ हजार ८०२ पदांसाठी तब्बल ५.६ लाख अर्ज, सार्वजिनक आरोग्य विभागातील ५ हजार ७७८ जागांसाठी ४.२ लाख अर्ज, तर वित्त विभागातील ९३२ जागांसाठी १.७४ लाख अर्ज दाखल झालेले आहेत.

सरकारी नोकरीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. कारण, ही नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी समजली जाते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ झालेली आहे. शिवाय शासकीय कर्मचाऱ्यांना सुविधा देखील चांगल्याप्रमाणत मिळतात. काही पदांसाठी तर निवृत्तीनंतरही पेंशन अन्य लाभ मिळत असतात. हे सर्व लाभ खासगी नोकरीत मिळत नाहीत. त्यामुळेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरूणांची धडपड सुरू असल्याचे दिसते.