मुख्याध्यापकांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय बांधकामासाठी निधी मिळालेल्या १३ शाळांनी अर्धवट बांधकाम करून ३२ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी संबंधित शाळांना बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देशही बजावण्यात आले हाते. परंतु याकडे दुर्लक्ष केलेल्या शाळांकडून अपहार केलेल्या निधीची वसुली करावी, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश नव्याने दाखल झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बजावले आहेत.

जिल्ह्यतील शाळांना २००३ ते २०१२ या कालावधीत १३ शाळांना ९० लाखांचा निधी मिळाला होता. परंतु परभणी, पूर्णा, गंगाखेड आणि सोनपेठ या तालुक्यांतील १३ शाळांनी बांधकाम अर्धवट ठेवत रकमेत अपहार केल्याचे स्पष्ट झाले होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सचिव यांच्या खात्यावर रकमा जमा करण्यात आल्या होत्या. परंतु समितीने बांधकाम अर्धवट ठेवून रकमांमध्ये अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २०१४ ते २०१७ या कालावधीत पाच वेळा संबंधित शाळांना बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे नव्याने रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांना लक्षात आले. त्यांनी लगेच कडक भूमिका घेत संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांसह महापालिका प्रशासनास नोटिस बजावली. अपहार झालेली ३२ लाख २३ हजार ८८ रुपयांची रक्कम संबंधित शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून चालू दरसूचीनुसार वसूल करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचेही सांगण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करताच गंगाखेड प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांकडून ५ लाख १३ हजार रुपये वसूल करून गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तर काल्रेवाडी जि.प. शाळेकडूनही ९० हजार रुपये वसूल करून खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित शाळांकडून वसुलीची कारवाई सुरू आहे. दरम्यान महापालिकेअंतर्गत बांधकाम रखडलेल्या पाच शाळांच्या मुख्याध्यापकांसह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांच्या आत व्याजासह रकमा खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने या १३ शाळांच्या मुख्याध्यापकांसह इतरांचे धाबे दणाणले आहे.

या शाळांमध्ये अपहार

परभणी महापालिकेअंतर्गत शाळा क्र.४ ने ३ लाख ४ हजार ६२५ रुपये, अंबिका नगर शाळा १ लाख ४० हजार ८३४ रुपये, खानापूर शाळा १ लाख ३७ हजार ७२५ रु., परसावत नगर शाळा ३ लाख १९ हजार १९९ रु., जिजामाता पोलीस क्वोर्टर ५ लाख २२ हजार ६१० रु., उखळद जि.प.शाळा १ लाख २२ हजार ८४ रु., जि. प. वझूर ता. पूर्णा ११ हजार ५०० रु., गंगाखेडच्या जि.प. खळी २ लाख ३६ हजार ६३६ रु., प्राथमिक शाळा गंगाखेड ४ लाख ५८ रु., जि.प. शाळा कारलेवाडी १ लाख ९६ हजार रु., जि.प.शाळा इसाद २ लाख ५६ हजार, जि. प. शाळा शेंडगा २ लाख २५ हजार, जि. प. शाळा उंडेगाव २ लाख ५६ हजार ५००, सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा जि. प. शाळा ३५ हजार ८७५ रुपयांचा अपहार झाला आहे. यातील उखळद शाळेचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे.