राज्यात एकीकडे अनेक भागांत मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत केले असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्य़ात पावसाने निराशा केल्याने दुष्काळाचे संकट कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर याच जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास अचल पाणीसाठा पार करून चल पाणीसाठा भरण्यास सुरुवात झाली. सायंकाळी सहापर्यंत धरणात चल स्वरूपात २.३० टक्के पाणीसाठा झाला होता. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत धरणात सुमारे ३२ टीएमसी पाणीसाठय़ाची आवक झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

राज्यातील निवडक अशा मोठय़ा धरणांपैकी एक म्हणून उजनी धरण ओळखले जाते. या धरणाची तब्बल १२३ टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्य़ात पावसाने साथ न दिल्यामुळे दुष्काळी स्थिती असताना पुणे जिल्ह्य़ात पडलेल्या पावसाच्या जोरावर उजनी धरणात १२० टीएमसीपर्यंत पाणीसाठा झाला होता. परंतु पाण्याच्या नियोजनाचा दुष्काळ असल्यामुळे एवढय़ा मोठय़ा पाण्याचा साठा काही महिन्यातच संपत आला. गेल्या ३ जुलै रोजी तर धरणातील पाणीसाठा उणे ५९.७४ टक्के अशा निचांकी पातळीवर गेला होता. त्यातच संपूर्ण जिल्ह्य़ात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत असले तरी आतापर्यंत एकदाही दमदार पाऊस झाला नाही. केवळ ४४ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे सार्वत्रिक निराशेचा सूर असतानाच शेवटी उजनी धरणात पाणीसाठा वाढू लागल्याने सर्वाना दिलासा मिळाला आहे. गेल्या २३ दिवसांत धरणात ३२ टीएमसी एवढय़ा पाण्याची आवक झाली आहे.

मंगळवारी दुपापर्यंत धरणात एकूण ६३ टीएमसी पाणीसाठा होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणात पाण्याची पातळी ४९१.२०० मीटर इतकी होती. तर ६४.८५ टीएमसी पाणीसाठा होता. यात चल पाणीसाठा १.२० टीएमसी असून त्याची टक्केवारी २.३० होती.

दरम्यान, दौंड येथून धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह ५४ हजार १६६ क्युसेक इतका होता.

पुणे जिल्ह्य़ातील पावसामुळे पाणीसाठयात वाढ

पुणे जिल्ह्य़ात सध्या मुसळधार पाऊस होत असल्यामुळे तेथून सोडण्यात येणारे पाणी झपाटय़ाने उजनी धरणात येत आहे. आणखी काही दिवस पुणे जिल्ह्य़ातील घाटमाथ्यांवर अशाच पध्दतीने पाऊस कायम राहिल्यास उजनी धरण शंभर टक्के भरणे शक्य होणार आहे. दरम्यान, नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी बंधाऱ्यात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरासाठी उजनी धरणातून स्वतंत्रपणे पाणी सोडण्याची वेळ येणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.