पशुसंवर्धन विभागाच्या मध्यस्थीनंतर खाद्यपुरवठा सुरू

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : पालघर जिल्ह्यातील एकमेव वराह पालन केंद्रातील ३२५ हून अधिक डुकरांचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. डुकरांमुळे करोना विषाणू पसरतो या भीतीमुळे ग्रामस्थांनी त्यांच्यासाठीचा खाद्यपुरवठा रोखून धरला होता. पशूसंवर्धन विभागाने याप्रकरणी पोलिसांची मदत घेऊन ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर तो पुन्हा नियमित सुरू झाला आहे.

वसई तालुक्यातील सकवार गावाजवळी ढेकाळे येथे ग्रीन मेडोज नावाचे ३० वर्षे जुने व्यावसायिक वराह पालन केंद्र आहे. या केंद्रात सुमारे एक हजारांहून अधिक यॉकसाय जातीचे वराह आहेत. हे वराह संशोधनासाठी विविध ठिकाणी पाठविण्यात येतात. वराहांसाठी दररोज मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलामधून उरलेलेले जेवण खाद्य् म्हणून देण्यात येते. एका वराहाला दिवसाला ७ ते ८ किलो खाद्य् लागते. त्यासाठी दररोज दिड ते दोन टन खाद्य् टेम्पोमार्फत आणण्यात येते. टाळेबंदीमुळे अत्यावश्यक बाब म्हणून केंद्राच्या मालकांना पोलिसांनी खाद्यची वाहतूक करण्यासाठी पास दिलेला आहे. मात्र वराहांमुळे करोना पसरतो अशी अफवा या परिसरात पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या वराहांना पुरविण्यात येणारे खाद्यचे टेम्पो अडविण्यास सुरवात केली आहे. वारंवार विनवणी करूनही ग्रामस्थ गावात खाद्यचा टेम्पो येऊ देत नाही. त्यामुळे पर्याय म्हणूनकेंद्र मालकांनी पर्याय म्हणून चारा आणि भुसा देण्याचा प्रय केला मात्र तो या वराहांचा पचनी पडला नाही. मागील २० दिवसात या केंद्रात दररोज एकामागून एक वराहांचा मृत्यू होऊ लागला होता. केंद्रातील ३२७ हून अधिक डुकरांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्राचे मालक लिंकन  क्रास्टो यांनी सांगितले.

याबाबत क्रास्टो यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी  पत्र देऊन ग्रामस्थांमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आणि पुरवठय़ातील अडथळे दूर करण्याची मागणीही केली होती. या केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने  वराह पालन केले जाते. सर्व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, तरीही ग्रामस्थांनी वाट अडवली आहे. केंद्रात येणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांनाही येण्यापासून रोखले गेले, असे या पत्रात म्हटले होते. यानंतर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ प्रशांत कांबळे यांनी केंद्राला भेट देऊन  पाहणी करून खाद्य न मिळाल्याने डुकरांचा मृत्यू  झाल्याचे स्पष्ट झाले.