मराठवाडय़ातील पाणीटंचाई मे महिन्याच्या अखेरीस चांगलीच वाढली असून २२८ गावे व १६३ वाडय़ांना ३२५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाडय़ातील ८२८ प्रकल्पांमध्ये ६६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ांत तीव्र पाणीटंचाई आहे.
गारपिटीनंतर मराठवाडय़ातील तापमानात फारशी वाढ होत नव्हती. मात्र, मेअखेरीस पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. गेल्या पावसाळ्यात वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट तुलनेने कमी आहे. मात्र, तीन जिल्ह्य़ांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील ९२ गावांना १४० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. बीडमध्ये ८२ गावे व १३८ वाडय़ांना १०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर उस्मानाबादमध्ये टँकरची संख्या ६० आहे.
मराठवाडय़ात ११ मोठे प्रकल्प, ७५ मध्यम प्रकल्प, ७१८ लघु प्रकल्प व ११ गोदावरी नदीवर उच्च पातळी बंधारे आहेत. मांजरी नदीवरही बंधारे आहेत. पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. जायकवाडी जलाशयात ९ टक्के, माजलगावमध्ये २९ टक्के पाणीसाठा आहे. तेरणा, मांजरा व सीना-कोळेगाव ही तीन धरणे कोरडीठाक पडली आहेत. मांजरा नदीवरील उच्चपातळी बंधाऱ्यामुळे लातूर शहराला जाणवणारी तीव्र पाणीटंचाई काहीअंशा का होईना कमी झाली आहे.