वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक नऊ महिन्यांची बालिका शस्त्रक्रियेनंतर करोनाबाधित निघाल्याने तिच्या संपर्कातील डॉक्टरांसह ३३ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात १५ डॉक्टरांसह १८ इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयात करोना काळात सलग दुसऱ्यांदा एकाचवेळी अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्याची वेळ आल्याने रुग्णालयातील कामकाज प्रभावित झाले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात एक नऊ महिन्याचे बाळ उपराचारार्थ दाखल झाले होते. या बाळाला जन्मत:च गुदद्वाराजवळ जागा कमी असल्याने त्यावर शस्त्रक्रियेसाठी तिला भरती करण्यात आले. बालरोग विभागातील डॉक्टरांनी शल्यक्रिया डॉक्टरांशी चर्चा करून या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. करोना चाचणीकरिता बाळाचा ‘थ्रोट स्वॅब’ घेऊन तपासणीकरिता पाठवण्यात आला. दरम्यान, डॉक्टरांनी या बाळावर यशस्वी शस्त्रक्रियासुद्धा केली. त्यानंतर या बाळाचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने एकच खळबळ उडाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने तातडीने या बाळाच्या संपर्कात आलेल्या सर्व डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शल्यचिकित्सा विभागातील नऊ डॉक्टरांसह १४ जण, बालरोग विभागातील चार डॉक्टर, बधिरीकरण विभागातील दोन डॉक्टर, आठ परिचारिका आणि पाच चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे ३३ जणांना तातडीने विलगीकरण करण्यात आले.

करोनाबाधित बालिकेची प्रकृती सुधारत असून तिच्यावर विशेष दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचीही प्रकृती उत्तम असून सर्वाचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे. एकाचवेळी इतके सारे कर्मचारी विलगीकरण झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.