करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउनचा कालावधी आज 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाउन सुरू झाल्यापासून देशातील विविध भागांमध्ये अनेक स्थलांतरित अडकलेले आहेत. याबाबत आता सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. या मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील निवारा गृहांमध्ये असलेल्या मुळच्या मध्य प्रदेसमधील 332 मजुरांना मुंबईहून आलेल्या विशेष रेल्वेने भोपाळकडे रवाना करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवारा सेंटर व्यवस्थापन ) नितीनकुमार मुंडावरे आदी उपस्थित होते. प्रवासी मजुरांमध्ये इगतपुरी येथील 152, नाशिक मनपा हद्दीतील 106 व नाशिक तहसील क्षेत्रातील 74 अशा 332 जणांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 299 वर पोहचली आहे. यामध्ये नाशिक मनाप हद्दीतील 10 रुग्ण, नाशिक ग्रामीण हद्दीतील 12 रुग्ण,  मालेगावमधील 275 तर जिल्ह्याबाहेरचे दोन रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहेत.

देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं  लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.