पालिकेच्या आरोग्य विभागात एकही क्षयरोग तज्ज्ञ कायमस्वरूपी नाही

वसई : वसई विरार शहरात करोनाचा कहर सुरू असतानाच दुसरीकडे  शहरात क्षय रोग रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे. मागील ६० दिवसात ३३५  क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत. असे असतानाही पालिकेच्या आरोग्य विभागात एकही क्षयरोग तज्ञ डॉक्टर कायमस्वरूपी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आवश्यकता असेल त्यानुसार डॉक्टर उपलब्ध करून रुग्णांना उपचार द्यावे लागत आहेत.

वसई विरार शहरात क्षयरोग रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सन २०२० मध्ये शहरात ३ हजार २५१  रुग्ण आढळून आले होते. त्यात १३७ रुग्ण दगावले होते. तर सन २०२१  मध्ये फेब्रुवारी पर्यँत ३३५ रुग्ण तर एकाचा बळी गेला आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे अधिकारी डॉ. समीर झापुर्डे यांनी माहिती दिली की, शासनाने राबविलेल्या अभियांनाअंतर्गत  दर महिन्याला सरासरी १७५ ते २०० रुग्ण आढळून येत असून यात झोपडपट्टी परिसर व स्थलांतरित झालेल्या परिसरात याचे प्रमाण अधिक आहे. पालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रात या  रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.वसई विरार महानगरपालिका क्षयरोगाच्या निदानासाठी पुरवत असलेल्या आरोग्य सेवा अपुऱ्या आहेत. पालिकेकडे क्षय रोग तज्ज्ञ वैद्य नसल्याने सध्या स्थितीत  पालिकेकडून २ खासगी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे, यातील एक डॉक्टर विरार तर दुसरे डॉक्टर वालीव येथील आरोग्य केंद्रात आठवडय़ातील चार दिवस  असतात.  पाच युनिट तयार करण्यात आले असून प्रत्येक युनिट मध्ये केवळ  ५ निरीक्षक आहेत.  ३० कर्मचारी पूर्ण शहराचा भार सांभाळत आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमावरच पालिकेचा कारभार अवलंबून आहे.

निदानासाठी अडचणी

क्षयरोगाच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या चाचणीची सुविधा ही केवळ तुळिंज आणि वालीव येथील तपासणी केंद्रांत आहेत. मात्र सध्या तुळिंज येथील यंत्र (मशीन) बंद आहे. मात्र पूर्वी या दोन्ही तपासणी केंद्रांमधून दिवसाला १० ते १२ क्षयरोग रुग्णांचे निदान होत होते. परंतु आता एकच सुरू असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तर बुधवारी आणि शनिवारी सुरू असलेल्या बाह्य़ रुग्णसेवेत साधारण ५० रुग्णांचे निदान होत होते. मात्र करोनामुळे ऑगस्ट २०२० पासून तेही बंद आहे.  शासनाकडून पालिकेला क्षयरोग निदानासाठी २१ तपासणी केंद्रे मंजूर झाले आहेत. यापैकी केवळ १३ केंद्रे सुरू आहेत. यामुळे रुग्णांना अनेकवेळा थुंकी तपासणीसाठी बाहेर खासगी तपासणी केंद्रात जावे लागते. तर शासकीय केंद्रात अहवाल येण्याची प्रतीक्षा करावी लागते.

वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात फिजिशियन, चेस्ट फिजिशियन, गायनाकॉलॉजिस्ट व टीबी रुग्णांवर उपचार करण्यासाठी जे डॉक्टर नेमले आहेत तेच त्याठिकाणी उपचार देत आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी या डॉक्टरांकडून सेवा दिली जात आहे.

डॉ.सुरेखा वाळके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी