आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरला होणाऱया यात्रेत भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने(एसटी) पंढरपुरला जाणाऱया नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त राज्यभरातील २५० आगारातून एकूण ३,३५० अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार १५० अधिक बसेस सोडण्याचीही तयारी एसटीने ठेवली आहे. एखाद्या गावातील एकगठ्ठा लोकांना एकत्रित पंढरपुरची वारी करायची असेल तर गावातील नागरिकांनी आगार प्रमुखांकड़े लोकांची यादी द्यावी आणि बस आरक्षित करावी, असेही एसटीच्या वतीने सांगण्यात आले आहे. वारीसाठी पंढरपूरमधे या वर्षी तीन बस स्थानक असतील तर भीमा बस स्थानकावरुन विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी बसेस जाणार आहेत. विठ्ठल साखर कारखान्याहून खानदेशातील जिल्ह्याकरीता बसेस सोडण्यात येणार आहेत. चंद्रभागा बसस्थानकावरुन पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणेसाठी बसेस रवाना होतील. या बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी ५० बसेस द्वारे शटल सेवा असणार आहे. वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी १०० ते १५० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी पंढरपूर शहरात आणि मार्गावर १५ ते २० प्रवासी मदत केंद्र उभारणार असल्याचेही महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.