पिके करपली; सर्वच प्रकल्प कोरडे

प्रदीप नणंदकर, लातूर</strong>

देशभरात महाराष्ट्रात यावर्षी सर्वाधिक पाऊस झाला आहे. राज्यभरात वार्षिक सरासरीच्या इतका पाऊस झालेला असताना लातूर जिल्हय़ात मात्र वार्षिक सरासरीच्या केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे. पुरामुळे पिके पाण्याने कुजली, जनजीवन विस्कळीत झाले अशी एकीकडे स्थिती असताना लातूर परिसरात पाण्याविना पिके करपत आहेत. ऐन पावसाळय़ात उन्हाळय़ाचे चित्र सर्वत्र दिसते आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्याकरिता पायपीट सुरूच आहे. हवामान बदलाचा असा विचित्र फटका यावर्षीही परत सहन करावा लागेल याचा अंदाज नसल्याने लोकांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस ढळतो आहे.

जिल्हय़ातील सर्वच मोठे, मध्यम, लघू प्रकल्प अजूनही कोरडेठाकच आहेत. मांजरा व निम्नतेरणा या दोन मोठय़ा धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा या आठही मध्यम प्रकल्पात चिमणीलादेखील पिण्यासाठी पाणी नाही. लघू प्रकल्पांपैकी ४६ प्रकल्पांत पाण्याचा टिपूस नाही. उर्वरित प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ०.१ टक्का इतका आहे. जिल्हय़ात ६१ टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे लागते आहे. पावसाळय़ाचे आणखीन दोन महिने शिल्लक आहेत. मान्सूनने घोर निराशा केली. आता अपेक्षा परतीच्या मान्सूनच्या आहेत.

१९ ऑगस्ट अखेर अपेक्षित पावसाच्या २७७.३६ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तो ३४.५८ टक्के इतका आहे. औसा तालुक्यात सर्वात कमी वार्षिक सरासरीच्या २१.०८ तर लातूर तालुक्यात २२.९३ टक्के इतका कमी पाऊस आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात आता केवळ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत दहा दिवसांतून एकदा पाणी देता येईल इतकेच पाणी शिल्लक आहे. लातूर शहराबरोबरच उदगीर, अहमदपूर, औसा, मुरूड, किल्लारी अशा गावांना १५ दिवसांतून एकदा पाणी मिळते. २०१६ साली मे महिन्यात मिरजेहून लातूर शहराला रेल्वेने पिण्याचे पाणी पुरवले गेले. संपूर्ण जिल्हय़ावर दुष्काळाचे सावट असताना पाणी कुठे व कसे पुरवायचे हा प्रश्न भेडसावणार आहे.

शेतकरी अडचणीत

यावर्षी खरीप हंगामाचे सहा लाख, २५  हजार हेक्टर अंदाजित क्षेत्र असून यापैकी सव्वा लाख हेक्टरवर पेरण्याच करता आल्या नाहीत. कोरडे रान कशाला ठेवायचे म्हणत ५० टक्के शेतकऱ्यांनी जमिनीत फारशी ओल नसतानाही पेरणी करण्याचे धाडस केले व हे धाडस त्यांच्या आता अंगलट आले आहे. पावणेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र आहे. एक लाख हेक्टरच्या आसपास तूर तर उर्वरित खरीप ज्वारी, मका आदीचा पेरा झाला आहे. गतवर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने चाऱ्याच्या टंचाईला सामोरे जावे लागले होते. यावर्षी पुन्हा पावसाने दगा दिल्याने ‘वैरी झाला पावसाळा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट

* दररोज पाऊस आशा दाखवत लांबत असल्याने दिवाळीनंतर स्थलांतर करावे लागण्याच्या चच्रेने जिल्हाभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट आहे. अन्नधान्य उपलब्ध होईल, पण पाणी कुठून आणायचे असा प्रश्न आहे. गतवर्षी जलपुनर्भरणाच्या कामात जिल्हय़ाचा देशात पहिला क्रमांक आला आहे. ही आनंदाची बाब असली तरी पाऊसच पडला नाहीतर या कामाचा उपयोग काय? ही चिंताही दिवसेंदिवस प्रत्येकाच्या मनात मोठे घर करते आहे.

* कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचाही यित्कचितही परिणाम होत नाही. लातूर परिसरावर निसर्गाची ही अवकृपा नेमकी कोणत्या कारणाने आहे? या भागातील लोकांना चार घोट पाण्याची खात्री देता येईल का? याविषयी कोणी बोलायला तयार नाही. हवामान विभागाची मंडळी ढोबळ अंदाज व्यक्त करतात. पाऊस कधी, कुठे, केव्हा, किती, कसा पडेल? याबाबत जगभर शास्त्र प्रगत झाल्याचे सांगणारी मंडळी नेमकी माहिती लातूरकरांना का सांगत नाहीत? असा प्रश्न आहे.

* खरीप गेले, रब्बी तरी निश्चित हाती लागणार का, असा प्रश्न निर्माण होतो. येणारा दिवस पाऊस घेऊन येईल या आशेवर लोक आलेला दिवस कुढत काढत आहेत. दसरा व दिवाळीच्या सणाच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याची लगीनघाई जिल्हय़ातील सर्व मतदारसंघांत सुरू आहे. असा पाऊस रुसू लागला तर लातूरचे वाळवंट होईल का, निसर्गाचे चक्र बदलत असते.