करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ३४८ पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १७ हजार ४३९ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार २२५ जण, करोनामुक्त झालेले १४ हजार ३७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७७ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १७ हजार ४३९ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ८५५ अधिकारी व १५ हजार ५८४ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार २२५ पोलिसांमध्ये ३८६ अधिकारी व २ हजार ८३९ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १४ हजार ३७ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ४५३ व १२ हजार ५८४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १७७ पोलिसांमध्ये १ अधिकारी व १६१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देशभरासह राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.