नोटबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नाशिकमधील मुद्रणालयात युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरू झाली आहे. या कामासाठी दिवस-रात्र राबणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी सरकारने या कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे, असे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

केंद्र सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर बँका आणि एटीएममध्ये टंचाई निर्माण झाली. अजूनही काही एटीएम सुरळीत सुरू नाहीत. नोटांच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काहींना एटीएममधून रिकाम्या हाताने बाहेर पडावे लागत आहे. चलनाचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने नवीन नोटा छपाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकमधील मुद्रणालयात नवीन नोटांची छपाई युद्धपातळीवर सुरू आहे. ५०० रुपयांच्या नवीन नोटेसोबतच १००, ५० आणि २० च्या नोटांची छपाई करण्यात येत आहे. आठवडाभरात त्यात वाढ करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. या कामासाठी मुद्रणालयात अहोरात्र झटणाऱ्या कामगारांसाठी सरकारने खूशखबर दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान या मुद्रणालयात ५० आणि १०० च्या ३५ लाख नोटांची छपाई झाली आहे. यामुळे येत्या दिवसांत चलनाचा तुटवडा कमी होणार आहे.

नुकत्याच नाशिकमधील मुद्रणालयातून पाचशे रुपयांच्या पन्नास लाख नोटा रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात आणखी नोटा रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात येतील, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता ५० आणि १०० रुपयांच्या नवीन ३५ लाख नोटांची छपाई करण्यात आली आहे. त्या लवकरच रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात येतील. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत पाचशे रुपयाच्या ४० कोटी नोटा छापल्या जाणार आहेत. यासाठी दोन आठवड्यांपूर्वीच छपाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. देशभरात नऊ ठिकाणी नोटांची छपाई करण्यात येते. नाशिक, हैदराबादमध्ये दोन ठिकाणी तर मुंबई, कोलकाता, नोएडा, देवास, होशंगाबादमधील प्रत्येकी एका ठिकाणी नोटांची छपाई केली जाते.