खारभूमी विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे अलिबाग तालुक्यातील धेरंड खाडीकिनारी असलेल्या शेतीच्या बांधबंदिस्तीला भगदाड पडले असून सुमारे ३५० एकर भातशेती धोक्यात आली आहे. ती वाचविण्यासाठी शेतकरी अंगमेहनतीने बंदिस्तीची दुरुस्ती करीत आहेत.
अलिबाग तालुक्यातील खारेपाट परिसर म्हणजे एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखले जात असे. परंतु उधाणाचे खारे पाणी शिरून येथील बरीचशी शेतजमीन नापीक झाली. खाडीकिनारी असलेल्या बांधबंदिस्तीच्या दुरुस्तीची जबाबदारी खारभूमी विकास विभागाची, परंतु या विभागाने वर्षांनुवष्रे त्याकडे दुर्लक्ष केले.
मागील आठवडय़ात धेरंड येथील बांधबंदिस्ती उधाणाच्या पाण्याने फुटली. ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. अधिकाऱ्यांनी पाहणी केली; परंतु पुढे काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे ३५० एकर भातशेती वाचवण्यासाठी शेतकरी पुढे सरसावले. गावातील ३०० हून अधिक स्त्री-पुरुष सध्या अंगमेहनतीने नवीन बांध घालण्याचे काम करीत आहेत. नोकरीधंद्याला असलेले पुरुष रजा घेऊन तर लेकुरवाळ्या महिला लहान मुलांना घरी ठेवून दुरुस्तीच्या कामात मग्न आहेत. शेकडो हात कामाला लागले असून हे काम आणखी तीन दिवस चालणार आहे. सध्या भातशेती तरारून वर आली आहे. बंदिस्ती वेळेत झाली नाही तर संपूर्ण शेतजमिनीत खारे पाणी शिरून ती नापीक होईलच, शिवाय हातातोंडाशी आलेले पीकही जाईल. धेरंड गावाबरोबर शहापूर गावच्या शेतीलाही धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती गावातील सदानंद पाटील यांनी व्यक्त केली.
या गावालगतची ४ हजार ५०० मीटर लांबीची बंदिस्ती खारभूमी विकास विभागाच्या अखत्यारीत येते. पण गेल्या १५ वर्षांत एकदाही या विभागाने दुरुस्ती केली नसल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ग्रामस्थ दरवर्षी साधारण मार्चअखेरीस अंगमेहनतीने या बंदिस्तीची डागडुजी करतात, त्यामुळे ती टिकून आहे. दुसरीकडे समोरील माणकुले गावची जमीन खाऱ्या पाण्याने नापीक झाल्यानंतर तेथे नवीन बंदिस्ती करण्यात आली. या बंदिस्तीवर झालेला खर्च वाया गेला आहे.
खारभूमी विकास विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या परिसरात अनेक कंपन्यांनी जमिनी घेतल्या आहेत. अलीकडेच टाटा पॉवर कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या आहेत. येथील खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याचे कंपनीने मान्य केले होते, पण अद्याप तरी तशा हालचाली दिसत नाहीत. यासंदर्भात खारभूमी विकास विभागाचे उपअभियंता भारती यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.