गेले तीन दिवस पडलेल्या धुवांधार पावसामुळे कोकण विभागात सुमारे ३५ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पावसाचा जोर गुरुवारी दुपारी ओसरल्यानंतर कृषी विभागाने विभागातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. त्यामध्ये नजर अंदाजे

एकूण ३५ हजार हेक्टरपर्यंत भातशेतीचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्यात सर्वाधिक , सुमारे १६ हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात सुमारे ९ हजार ४६५ हेक्टर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ६ हजार हेक्टर,  रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ६०० हेक्टर, तर पालघर जिल्ह्यात सुमारे १ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेले तीन दिवस कोकण विभागात पावसाने शब्दश: धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील नदी किंवा नाले-ओहोळांच्या कडेला असलेल्या शेतातील कापलेले भातपीक पाण्याच्या लोंढय़ामध्ये वाहून गेले. तसेच अनेक ठिकाणी शेतात कापणीला आलेले पीक जमिनीवर आडवे झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अर्जुना, कोदवली, लांजा येथील मुचकुंदी, रत्नागिरी तालुक्यात काजळी, बावनदी, तर संगमेश्वरच्या शास्त्री नदी किनाऱ्यावरील जास्त नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई,  हरचेरी, पोमेंडी, कजरघाटी, सोमेश्वर, निवळी, कोंडवी, बावनदी, टिके येथील शेतकऱ्यांनाही या निसर्गकोपाचा फटका बसला आहे. निवळीत बावनदीचे पाणी किनारा ओलांडून आल्यामुळे कापलेले भात रचून ठेवलेले कापलेले भात वाहून जाण्याची भीती होती. अशा परिस्थितीत थोडी उघडीप मिळताच ढगाळ वातावरणातही शेतकरी भिजलेले भात वाळवण्यासाठी धडपडत होते. काही शेतकऱ्यांनी किमान कणी तरी मिळेल या अपेक्षेने ओले भातही झोडले. पण ते भात सुकवल्यावर कुबट वास येतो. चार महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी भाताबरोबर नाचणीचेही पिक वाहून गेले आहे.

दरम्यान गुरुवारी संध्याकाळी कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव ओसरल्यामुळे पावसाचाही जोर कमी झाला.

शुक्रवारी सकाळी पावसाने उघडीप दिली. पण  वातावरण ढगाळ  राहिले. शनिवारी या हवामानात आणखी सुधारणा होईल. त्यानंतर भातकापणीच्या कामाला गती येईल, अशी अपेक्षा आहे.