रब्बी पिकांच्या पसेवारीवरून लोकप्रतिनिधी व प्रशासनात ३ महिने चाललेल्या शीतयुद्धानंतर जिल्ह्याच्या ३५६ गावांतील रब्बी पिकांची निघालेली ४४ पसे अंतिम पसेवारी गेल्या मार्चमध्ये जाहीर करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार या गावातील शेतकऱ्यांना मदतीपोटी १०० कोटी रुपये प्राप्त झाले. ही रक्कम बुधवारी तालुक्यांना वितरित करण्यात आली.
जिल्ह्यात गतवर्षी सरासरीच्या ५० टक्केही पर्जन्यमान झाले नाही. रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसला. अत्यल्प पावसामुळे स्रोतांच्या पाणीपातळीतही म्हणावी तशी वाढ होऊ शकली नाही. पाण्याअभावी रब्बी पिकेही करपून गेली. त्यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला. जिल्ह्यात ७३७ महसुली गावे असून, यात खरीप पेरणी पिकांखालील ३६२, तर रब्बी पिकांखाली पावणेचारशे गावे आहेत.
शासकीय मदतीत अन्याय झालेल्या जिल्ह्याच्या उर्वरित ३५६ गावांतील रब्बी पिकांची अंतिम पसेवारी मार्च महिन्यात काढण्यात आली. यात उस्मानाबाद तालुक्यातील ६९, तुळजापूर ४७, भूम ९०, लोहारा १०, वाशी २३ व परंडा तालुक्यातील ९६ गावांची पसेवारी ५० पेक्षा कमी आल्याचे समोर आले. त्यानुसार ७ तालुक्यांतील ३५६ गावांची रब्बी पिकांची पसेवारी ४४ इतकी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात रब्बी पेरणीची ३७५ गावे असून, त्यापकी कळंब तालुक्यात १९ गावांतील रब्बी पेरा दोन-तृतीयांशापेक्षा जास्त असल्यामुळे त्या गावांची पसेवारी खरीप हंगामात जाहीर केली असल्याने, या गावांची रब्बी हंगामाची पसेवारी निरंक होती.
३५६ गावांतील शेतकऱ्यांना मदतीपोटी १०० कोटी निधी प्राप्त झाला. प्राप्त निधीमध्ये कोरडवाहू क्षेत्राला प्रतिहेक्टरी ४ हजार ५०० रुपये, तर बागायती क्षेत्राला १२ हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान, ऐन खरीप हंगाम पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असल्यामुळे फायदा होणार असून, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
तालुकानिहाय मदत
उस्मानाबाद १९ कोटी, ९३ लाख, ४० हजार ८६५
तुळजापूर १३ कोटी, ५० लाख, ७६ हजार ००५
उमरगा ६ कोटी, ९६ लाख, ३४ हजार ३८०
लोहारा २ कोटी, ९२ लाख, ५८ हजार ९६५
वाशी ५ कोटी, १४ लाख, ९३ हजार ३१५
परंडा २९ कोटी, ८७ लाख, २३ हजार ४७०
भूम २२ कोटी, २० लाख, ७९ हजार
एकूण १०० कोटी, ५६ लाख, ६ हजार.